
वीज दरवाढ आंदोलन
वीज दरवाढविरोधी
आंदोलनात सहभागाचे आवाहन
कोल्हापूर ः महावितरण कंपनीने ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव नियामक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविला. या प्रस्तावावर सध्या हरकती आणि सूचना मागवून वीज ग्राहकांची बाजू मांडली जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २८) सकाळी दहाला विविध औद्योगिक संस्थांतर्फे महावितरण कार्यालयावर आंदोलन होईल. त्यात सर्व उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष हर्षद दलाल, उपाध्यक्ष दिनेश बुधले यांनी केले आहे. वीजदरवाढविरोधी उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या मागण्या व भावना राज्य शासनास कळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे आणि महावितरण कंपनीच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात वीजदरवाढ रद्द करावी, यासाठी निवेदन दिले जाणार आहे. त्यानंतर कार्यालयाबाहेर वीजदरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात येईल. इंजिनिअरिंग असोसिएशनसह ‘गोशिमा’, ‘स्मॅक’, कागल पंचतारांकित एमआयडीसी, चेंबर ऑफ कॉमर्स आदी संस्थांचा त्यात सहभाग असेल.