वीज दरवाढ रद्द करा, अन्यथा उद्योग-व्यवसाय बंद ठेवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज दरवाढ रद्द करा, अन्यथा उद्योग-व्यवसाय बंद ठेवणार
वीज दरवाढ रद्द करा, अन्यथा उद्योग-व्यवसाय बंद ठेवणार

वीज दरवाढ रद्द करा, अन्यथा उद्योग-व्यवसाय बंद ठेवणार

sakal_logo
By

85732
...

... अन्यथा उद्योग-व्यवसाय बंद ठेवणार
---
‘महावितरण’च्या दारात प्रस्तावाची होळी; लढा तीव्र करण्याचा उद्योजक, व्यावसायिकांचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः ‘महावितरण’च्या प्रस्तावित वीज दरवाढीने उद्योग, व्यवसाय क्षेत्राचे कंबरडे मोडणार आहे. ही दरवाढ आम्हाला परवडणार नाही. त्यामुळे ती रद्द करा, अन्यथा आम्ही ‘महावितरण’ची वीज घेणार नाही. दर कमी होईपर्यंत उद्योग-व्यवसाय बंद ठेवले जातील, असा इशारा कोल्हापुरातील उद्योजक, व्यावसायिकांनी आज दिला. या दरवाढीविरोधातील लढा तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी केला.
येथील ताराबाई पार्क परिसरातील ‘महावितरण’च्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारात उद्योजक, व्यावसायिकांनी वीज दरवाढीच्या प्रस्तावाची होळी करून निषेध व्यक्त केला. ‘वीज दरवाढ रद्द करा’ अशी घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला.
या वेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, की देशात सर्वाधिक वीजदर महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे प्रस्तावित वीजदरवाढ अयोग्य आहे. एक देश एक वीजदर धोरण राबवावे. प्रस्तावित दरवाढ रद्द होईपर्यंत तीव्र आंदोलन केले जाईल. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष आनंद माने आणि प्रदीपभाई कापडिया म्हणाले, की अन्य राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यातील वीजदर जादा आहे. त्यामुळे दरवाढ रद्द करून सध्याचे दर कमी करावेत.
या सभेनंतर आंदोलनकर्ते उद्योजक, व्यावसायिकांनी ‘महावितरण’च्या कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता परेश भागवत यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्या वेळी ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, की प्रस्तावित दरवाढ अन्यायकारक असून ती रद्द करावी, अन्यथा आम्ही उद्योग-व्यवसाय बंद ठेवून त्याविरोधात लढा देणार. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष हर्षद दलाल म्हणाले, की क्रॉस सबसिडी रद्द करा. ‘मॅक’चे अध्यक्ष हरिश्‍चंद्र धोत्रे म्हणाले, की पुढील तीन वर्षे कोणतीही दरवाढ करण्यात येऊ नये.
यावर मुख्य अभियंता भागवत म्हणाले, की उद्योजक-व्यावसायिकांच्या मागण्या, भावना वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोचविण्यात येतील. या वेळी कार्यकारी अभियंता अभिजित सिकनीस, ‘स्मॅक’चे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष एम. वाय. पाटील, राजू पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष दीपक चोरगे, रणजित पाटील, मोहन पंडितराव, रामचंद्र लोहार, इंजिनिअरिंग असोसिएशनचे प्रसन्न तेरदाळकर, संजय अंगडी, श्रीकांत दुधाणे, प्रदीप व्हरांबळे, कोल्हापूर चेंबरचे संजय पाटील, संपत पाटील, राहुल नष्टे, प्रशांत शिंदे, अनिल धडाम, संभाजी पोवार, धर्मपाल जिरगे, ‘आयआयएफ’चे विनय खोबरे आदी उपस्थित होते. दरम्यान, उद्योजक व व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनाही दिले.
...
तर, आम्ही गुजरातची वीज घेणार
‘खासगी उत्पादकांकडून चार रुपयांत वीज मिळत असताना आम्ही ११ रुपयांनी ‘महावितरण’ची वीज का घ्यायची? खासगी उत्पादकांची वीज घेण्यास परवानगी द्यावी’, अशी मागणी संजय शेटे यांनी केली. गुजरातमधील खासगी उत्पादक सध्या छत्रपती संभाजीनगर औद्योगिक वसाहतीत वीज पुरवितात. त्याच धर्तीवर आम्हीही वीज घेण्याचा विचार करीत असल्याचे हर्षद दलाल यांनी सांगितले.