
परभाषेतून शिक्षण मालिका भाग १
लोगो- परभाषेतून शिक्षण ः मालिका भाग १
----
इंट्रो -
त्यांची मातृभाषा मराठी नाही. तरी मराठी मातृभाषा असणाऱ्या कोल्हापुरात त्यांचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेत सुरू आहे. अशा परभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा, तेथील विद्यार्थी, शिक्षक यांच्या कामाचा आढावा घेणारी मालिका.
-
३ भाषा, १०२ शाळा अन् १२ हजार ११० विद्यार्थी
ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः आपला संपूर्ण जिल्हा मराठी भाषिकबहुल लोकांचा. मात्र, रोजगाराच्या निमित्ताने अन्य भाषिकही इथे स्थायिक झाले. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा निघाल्या. सध्या जिल्ह्यात कन्नड, हिंदी, उर्दू भाषेतील १०२ शाळा आहेत. त्यामध्ये सुमारे १२ हजार ११० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका बाजूला महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादात मराठी भाषिकांवर अन्याय होत असताना जिल्ह्यात मात्र कन्नडसह आणखी दोन परभाषांमधील अभ्यासक्रम सुरू आहेत, हे विशेष.
राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासूनच कोल्हापुरात औद्योगिकरणाची सुरुवात झाली. साखर कारखान्यांनीही यात भर घातली. त्यामुळे येथे काम करण्यासाठी अन्य राज्यांतून कामगार आले. त्यांची चौथी, पाचवी पिढी आता येथे राहते आहे; पण त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करून काही परभाषेतील शाळांची येथे सुरुवात करण्यात आली. काही शाळा शासनाच्या अनुदानावर चालत होत्या, तर काही शाळा या समाजाने चालवल्या. या शाळांमधून या परभाषिकांच्या पिढ्यान्पिढ्या शिकल्या. आपल्या प्रदेशापासून लांब येऊनही त्यांची आपल्या मातृभाषेशी असणारी नाळ कायम राहिली. शासनानेही त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे परप्रांतातही त्यांना त्यांच्या भाषेत शिक्षण मिळाले. त्यामुळे त्यांचे शिक्षण सुरू राहिले; अन्यथा या परभाषिकांची मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाण्याचा धोका होता. या शाळांनी केवळ शिक्षण दिले नाही, तर भाषेच्या माध्यमातून एका संस्कृतीचे जतन केले.
चार्ट करणे
हिंदी
शाळा - २
विद्यार्थी - २६५
कन्नड
शाळा - ३
विद्यार्थी - ५९६
उर्दू
शाळा - ९७
विद्यार्थी - ११, २४९
चौकट
सिंधी समाजाची शाळा बंद
फाळणीच्या काळात सिंध प्रांतातून मोठ्या प्रमाणात नागरिक भारतात आले. गांधीनगर येथे त्यांची वसाहत वसली. इथे राहिलेल्या सिंधी नागरिकांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळावे यासाठी सिंधी कुमार विद्यालय आणि सिंधी कन्या विद्यालय सुरू केले. ३० ते ४० वर्षे या शाळा सुरू होत्या. सिंधी समाजाच्या येथील तीन पिढ्या या शाळेत शिकल्या. मात्र, नंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या. तेथे सिंधी समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिनी जाऊ लागले. त्यामुळे सिंधी शाळेतील ओघ कमी झाला. त्यामुळे काही वर्षांपासून या सिंधी माध्यमातील शाळा बंद आहेत.