
दृष्टीदिव्यांग विद्यार्थ्यांनी अनुभवले शरीररचनाशास्त्र
85949
.......
दृष्टी-दिव्यांग विद्यार्थ्यांनी अनुभवले शरीररचना शास्त्र
शिवाजी विद्यापीठात विज्ञान दिनानिमित्त प्रदर्शन; त्रिमितीय प्रकल्पांची मांडणी
कोल्हापूर, ता. २८ ः ‘मानवी शरीराची अंतर्गत रचना कशी असते, हे आज आम्हाला प्रथमच स्पर्शज्ञानाच्या माध्यमातून अनुभवता आले. हा अनुभव अत्यंत रोमांचक ठरला,’ अशी प्रतिक्रिया शहरातील विविध शाळांतील दृष्टी-दिव्यांग विद्यार्थ्यांनी येथे व्यक्त केली. निमित्त होते शिवाजी विद्यापीठाने जागतिक विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या दृष्टी- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष विज्ञान प्रदर्शनाचे.
विद्यापीठाच्या समावेशी शिक्षण संसाधन केंद्र व युजीसी स्किम फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटीजतर्फे आज विज्ञान दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या विविध शाळांतील दृष्टी-दिव्यांग विद्यार्थी व त्यांच्या विशेष शिक्षकांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातील व्हर्चुअल क्लासरूममध्ये करण्यात आले. अंध विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध प्रयोग समजावेत, शरीररचना शास्त्र त्यांनी समजून घ्यावे, जेणेकरून विज्ञानातील संकल्पना त्यांना सुलभपणे समजतील, या हेतूने प्रदर्शनामध्ये अनेकविध त्रिमितीय प्रकल्पांची मांडणी करण्यात आली. ती हाताळून हे विद्यार्थी रचना समजावून घेत होते.
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी प्रदर्शनास भेट दिली. ते म्हणाले, ‘अंध विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील प्रयोगांचे हे समजावणे केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता त्यांना कायमस्वरूपी शिकता आले पाहिजे. यासाठी विद्यापीठातील समावेशी शिक्षण संसाधन केंद्र त्यांच्यासाठी पूर्ण वेळ काम करेल.’
प्रकल्प सहाय्यक सतीश नवले म्हणाले, ‘विज्ञानाचे नवनवीन प्रयोग दृष्टी-दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचा मानस आहे.’ प्रदर्शनाच्या नियोजनासाठी राजाराम महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी मयुरी आवळे, पल्लवी राणे, अमृता किल्लेदार, प्रमोद कोराणे, ओंकार कांबळे, तुषार सुतार यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. युजीसी स्किम फॉर पर्सन व्हिथ डिसॅबिलिटीज या योजनेच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांनी प्रास्ताविक केले. भगवान लोखंडे यांनी आभार मानले.
...
प्रदर्शनात विज्ञानविषयक २०० पुस्तके
ज्ञानस्रोत केंद्राने विज्ञानविषयक पुस्तके, संशोधन प्रबंधांचे प्रदर्शन मांडले. त्यात शुद्ध विज्ञानासह माहिती तंत्रज्ञान, विज्ञान कथा -कादंबऱ्या, अन्नविज्ञान आदी विषयांवरील सुमारे २०० पुस्तके होती. उपग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर यांनी प्रदर्शनाची माहिती दिली.