
आरोपीला शिक्षा
विनयभंगबद्दल आरोपीला
महिन्याची साधी कैद
गडहिंग्लज : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने आरोपी रवींद्र पांडुरंग जाधव (वय ३०, रा. देसाई कॉलनी, आजरा) याला दोन वेगवेगळ्या कलमान्वये प्रत्येकी १ महिने ९ दिवसांची साधी कैद व एक हजार रुपये दंड, न भरल्यास १५ दिवसांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा सत्र तथा विशेष न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे अॅड. एस. ए. तेली यांनी काम पाहिले. २४ डिसेंबर २०१६ रोजी व त्यापूर्वी पंधरा दिवस अशा दोन वेळा संबंधित पीडित १७ वर्षीय मुलीचा मोटारसायकलने पाठलाग करून जाधव याने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाइकाने पोलिसांत तक्रार दिली. यामध्ये जाधव याला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारतर्फे अॅड. एस. ए. तेली यांनी सहा साक्षीदार तपासले.
-------
लोखंडी रॉडने मारहाणीत
गडहिंग्लजला एक जखमी
गडहिंग्लज : शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने लोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीत महेश पांडुरंग बागडी (शेंद्री रोड, गडहिंग्लज) हा जखमी झाला. याप्रकरणी याच परिसरातील महेश गोविंद नाईक याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, बागडी याचे चिकन विक्रीचे दुकान आहे. दुपारी नाईक याने चिकन विकणाऱ्या बागडीकडे पाहून शिवीगाळ केली. त्यावर बागडीने त्याला शिवीगाळ का केलास, अशी विचारणा केली. तेव्हा नाईकने रागाच्या भरात लोखंडी रॉडने बागडीच्या डोकीत मारले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी बागडीने याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे.