
ठिय्या आंदोलन
प्रकल्पग्रस्तांचा २ मार्चला मोर्चा
कोल्हापूर ता. २८ : श्रमिक दलातर्फे जिल्ह्यातील वारणा धरण, चांदोली अभयारण्यसह चित्री, चिकोत्रा, धामणी, उचंगी अशा प्रकल्पग्रस्तांनी सोमवार (ता. २७) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची प्रशासनाकडून दाखल घेतली नसल्याने उपवनसंरसक्षक प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर २ मार्चला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला, असे पत्रक श्रमिक मुक्ती दलातर्फे प्रसिद्धीस दिले आहे.
जिल्ह्यातील ५०० हून अधिक प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या धरून आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे आंदोलन केले नाही. परंतु विद्यार्थीदशेपासून २४ ते २५ वर्षे प्रकल्पग्रस्त म्हणून न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे ठोठावत आहोत. धरणामुळे गावे सुजलाम सुफलाम झाली म्हणतात.. पण आम्ही बेघर झालो याकडे लक्ष कधी देणार. आमच्या किती पिढ्यानी लढा द्यायचा? अशा तीव्र भावना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या देऊन बसलेल्या प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केल्या.
अंथरूण, पांघरूण घेऊन तयारीनिशीच प्रकल्पग्रस्त बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. धरण झालं तेव्हा विद्यार्थी होतो. नागनाथ अण्णांसोबत झालेल्या आंदोलनात सहभागी होतो. आज उतारवयातही आंदोलक म्हणून कलेक्टर ऑफिसच्या दारात बसलोय. इथल्या इमारती सुधारल्या, आमच्या जमिनी दिल्यावर धरणं पूर्ण झाली. शेती सुधारली..पण आम्ही बेघर झालो अशा शब्दात तांबवे येथील धोंडिबा सुतार आणि धोंडिबा पेजे यांनी भावना व्यक्त केल्या. मुले नातवंडांना गावात ठेवून बहुतांशी साथीला आलेले शेतकरी कुटुंबातील लोक या आंदोलनात सहभागी जागे झाले आहेत.
शासन पुनर्वसन करणार म्हणत घराच्या जागेसाठी व्याज मागत आहेत. आम्हाला इतके वर्ष न्याय दिला नाही त्याचे व्याज भरपाई म्हणून शासन देणार काय, असा प्रश्न प्रकल्पग्रस्त महिलांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावाकडून आलेले जेवणाचे डबे पंगतीत सोडत आहेत. विविध प्रश्न घेऊन रस्त्यावर उघड्यावर संसार थाटून आहेत.