उत्तम सेवाभावात सुविधांची वाणवा

उत्तम सेवाभावात सुविधांची वाणवा

सेवा उत्तम, सुविधांची मात्र वानवा
एम. आर. देसाई फिजिओथेरपी सेंटरकडे दुर्लक्ष; महापालिकेकडून हवा निधीचा डोस

सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २८ : अलीकडच्या काळात बैठी जीवनशैली, खराब रस्‍ते व अपघातांमुळे पाठीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. याचबरोबर विविध आजारांत फिजिओथेरपीचाही वापर वाढत आहे. बऱ्याच वेळा खासगी फिजिओथेरपी केंद्रातील उपचारांचा खर्च गोरगरिबांना परवडत नसल्याने ते महापालिकेच्या फिजिओथेरपी केंद्रांना प्राधान्य देतात. न्यू शाहूपुरीतील एम. आर. देसाई सेंटरमधील कर्मचाऱ्यांचा सेवाभाव व उपाचारातून मिळणारा दिलासा यामुळे रुग्‍णांचा या केंद्राकडे ओढा आहे. मात्र, दहा-वीस वर्षांत या केंद्राला निधीच न दिल्याने ते मोडकळीस आले आहे. किमान प्रशासकीय काळात तरी या केंद्राला उर्जितावस्‍था मिळणार का, असा प्रश्‍‍न उपस्‍थित होत आहे.
शहरात महापालिकेच्या वतीने दोन फिजिओथेरपी सेंटर चालवली जातात. एक गांधी मैदान व दुसरे न्यू शाहूपुरीत आहे. सर्वांत जुने सेंटर हे न्यू शाहूपुरी येथील असून, येथे रुग्‍णांचा सतत ओघ असतो. या ठिकाणी पाठदुखी, मानदुखी, कमरदुखी, सांधेदुखी, मणक्यांचे आजार, छातीचे व पोटाचे स्‍नायू, डोकेदुखी, मायग्रेन याचबरोबर अपघात, जन्‍मजात आलेले काही आजार आदींवर उपचार करण्यासाठी लहान मुलांपासून वयस्‍कापर्यंत अनेकजण उपचारासाठी येतात. मात्र, येथील अनेक उपकरणे अद्ययावत नाहीत. तसेच भौतिक सुविधांची वानवा आहे.
सेंटरमधील फर्निचर ३० वर्षांपूर्वीचे आहे. पडदे, कपाटे खराब झाली आहेत. ये‍णाऱ्या रुग्‍णांसाठी बैठक व्यवस्‍था नाही. खुर्ची, टेबल हे खराब झाले आहेत. केंद्रातील फरशा उखडलेल्या आहेत. उपचाराची अनेक साधनेही खराब झाली असून, ती नव्याने खरेदी करण्याची आवश्यकता आहे. इमारतीची पूर्णत: रंगरंगोटी करणे आवश्यक आहे. निधीची मागणी केली की, स्‍ट्रक्‍चर ऑडिटचेही कारण दिले जाते. असे असताना केवळ साडेआठ लाखांच्या निधीचीही तरतूद केली होती. आताही अनेक अधिकारी, पदाधिकारी, माजी सदस्य येथे उपचार घेतात. निधी देण्याची घोषणा करतात; मात्र आजपर्यंत निधी काही मिळालेला नाही.

चौकट
दृष्टिक्षेपात सेंटर...
स्‍थापना-१९८४
प्रत्यक्षात सुरुवात-१९९२
तंत्रज्ञ व डॉक्‍टर- ७
दररोज रुग्‍णांवर होणारे उपचार- ५०
माफक फीमधील उपचार- ६५ रुपये
...
कोट
फिजिओथेरपी सेंटरच्या दुरुस्‍तीची व रंगरंगोटीची आवश्यकता आहे. येथील सेवेबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्‍त होत आहे. येणाऱ्या अर्थसंकल्‍पात या सेंटरसाठी आर्थिक तरतूद करण्याचे नियोजन केले आहे. तसा प्रस्‍तावही तयार केला जात आहे. पुढील काळा‍त रुग्‍णांची गैरसोय होणार नाही. त्यांना चांगल्या सुविधा मिळतील यासाठी महापालिका प्रयत्‍न करत आहे.
-रविकांत आडसूळ, उपायुक्‍त.
.....
कोट
शाहूपुरी फिजिओथेरपी सेंटर येथील उपचार हे खूपच प्रभावी आहेत. अगदी कमीत कमी वेळात या उपचारांनी मानेचे दुखणे बरे झाले. कर्मचाऱ्यांचा प्रेमळ स्‍वभाव, हा या केंद्राचा आत्‍मा आहे. रुग्‍णांना अत्यंत सौजन्याची वागणूक दिली जाते. कर्मचारी मागील २० वर्षांपासून कार्यरत असल्याने त्यांचा उपचारात हातखंडा आहे. सुविधा व मशिनरी वाढल्यास या केंद्रात आणखी रुग्‍ण उपचारासाठी येतील.
-विनोद घाडगे, उपचार घेतलेले रुग्ण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com