
पाणीपट्टी थकली; २ टक्के व्याजाचा भुर्दंड
इचलकरंजी महापालिका
-------------------
पाणीपट्टी थकली; २ टक्के व्याजाचा भुर्दंड
इचलकरंजीत १ एप्रिलपासून लागू; थकबाकी ९ कोटींवर गेल्याने महापालिकेचा प्रस्ताव
इचलकरंजी, ता. २८ ः कोणत्याही प्रकारचा दंड अथवा व्याजाची आकारणी केली जात नसल्यामुळे पाणीपट्टीची थकबाकी वाढत चालली आहे. सुमारे ९ कोटी थकबाकी आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून पाणीपट्टीवरही घरफाळ्याप्रमाणे दरमहा २ टक्क्यांप्रमाणे व्याज आकारणी करण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यामुळे पाणीपट्टी थकवल्यास मिळकधारकाच्या खिशाला व्याजाचा भुर्दंड बसणार आहे.
मुळात दरवर्षी पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न आणि पाणी पुरवठ्यावर होणारा खर्च यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे किमान पाणीपट्टी वसुली होणे आवश्यक आहे; पण घरफाळ्याप्रमाणे थकीत पाणीपट्टीवर व्याजाची आकारणी केली जात नाही. त्यामुळे नागरिक घरफाळा भरत आहेत. मात्र, पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आली आहे. सुमारे ९ कोटी ५० लाख थकबाकी आहे. त्यातील सुमारे ४ कोटी जुनी थकबाकी आहे. ही थकबाकी दरवर्षी वाढतच चालली आहे. ही बाब प्रशासनाकडून गांभीर्याने घेतली आहे. सर्वसाधारणपणे १८०० रुपये वार्षिक पाणीपट्टी आहे.
घरफाळा आणि पाणीपट्टी भरण्याची अंतिम मुदत दरवर्षी ३१ डिसेंबर असते. त्यानंतर मात्र संयुक्त करावर दरमहा दोन टक्के व्याजाची आकारणी केली जाते. पाणीपट्टी थकल्यास व्याज आकारणी केली जात नाही. त्यामुळे मिळकतधारकांचा कल पाणीपट्टीऐवजी घरफाळा भरण्याकडे जास्त दिसून येत आहे. त्यामुळे पाणीपट्टी वसूल करण्यात अडथळा येत आहे. त्यावर उपाय म्हणून घरफाळ्याप्रमाणे पाणीपट्टीवरही १ एप्रिलपासून दरमहा २ टक्के व्याज आकारणी करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मिळकतधारकांना आता पाणीपट्टी थकवल्यास व्याज आकारणीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
----------
सांगली पाटबंधारेचे ४ कोटी २४ लाख भरले
कृष्णा नदीतून पाणी उपशापोटी सांगली पाटबंधारे विभागाची सुमारे १२ कोटी थकबाकी आहे. यातील दंड व व्याज आकारणी तब्बल ४ कोटींहून अधिक आहे. महापालिका प्रशासनाने सोमवारी ४ कोटी २४ लाख रुपये सांगली पाटबंधारे विभागाची थकबाकी भरली. दंड आणि थकबाकी माफ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास उर्वरित ४ कोटी २५ लाखांची थकबाकी एकदम भरण्याची तयारी महापालिका प्रशासनाने दर्शवली आहे.
----------
कोल्हापूर पाटबंधारेचे १ कोटी ३२ लाख भरणार
पंचगंगा नदीतील पाणी उपशापोटी कोल्हापूर पाटबंधारे विभागाची साडेतीन कोटींची थकबाकी आहे. यामध्ये सुमारे दीड कोटी दंड व व्याज आकारणी केली आहे. ही रक्कम माफ करण्याचाही प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. उद्या (ता. १) १ कोटी ३२ लाख रुपयांचा भरणा महापालिकेकडून करण्यात येणार आहे.