आता कोणतीही ‘फी’ भरा ऑनलाईन

आता कोणतीही ‘फी’ भरा ऑनलाईन

86110

विद्यापीठ लोगो
...............

आता कोणतीही ‘फी’ भरा ऑनलाईन
शिवाजी विद्यापीठाची नवी सुविधा; विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार

संतोष मिठारी, सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १ ः परीक्षा, गुणपत्रक, पदवीप्रमाणपत्र, कॉलेज मान्यता आदींबाबतची फी (शुल्क) भरण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना शिवाजी विद्यापीठात यावे लागत होते. त्यात वेळ, पैसे अधिक खर्च व्हायचे. ते लक्षात घेऊन विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाने फी भरण्याची पूर्णपणे ऑनलाईन पेमेंट सुविधा सुरू केली आहे.
विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना विविध ४५० प्रकारांतील शुल्क भरण्यासाठी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील जमा स्वीकृती विभागात प्रत्यक्षात उपस्थित राहावे लागत होते. दिवसभर या विभागाबाहेर रांग लागलेली असायची. अनेकांचा फी भरण्यासाठी दिवस खर्च व्हायचा. ते टाळण्यासाठी वित्त व लेखा विभागाने ‘ऑनलाईन रिसीट पोर्टल’ तयार केले. त्याचा वापर सुरुवातीला १ जानेवारीपासून विद्यापीठ कॅम्पसमधील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसाठी केला. त्याच्या यशस्वीतेनंतर या सुविधेची व्याप्ती वाढविण्यात आली. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तिन्ही जिल्ह्यांतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी दि. १ फेब्रुवारीपासून संबंधित सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
..
अशी आहे नवी सुविधा

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन रिसीट पोर्टल’चा टॅब दिला आहे. त्याद्वारे क्यूआर कोड, युपीआय, डेबिट-क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग यापैकी कोणत्या पर्यायाच्या माध्यमातून फी भरता येते. त्याची रिसिटदेखील काही क्षणात उपलब्ध होते. या सुविधेचा लाभ घेण्यापूर्वी वापरकर्त्याला पोर्टलवर लॉगीन करावे लागते. शिक्षक, कर्मचाऱ्यांना त्यांच्या एम्पलॉई नंबर, तर विद्यार्थ्यांना पीआरएन नंबर लॉगिन करता येते. कोणत्याही बँकेद्वारे ऑनलाईन फी भरता येते.
...

रोजची ३० लाखांची रोकड
ऑनलाईन सुविधा सुरू होण्यापूर्वी विविध शुल्काच्या माध्यमातून जमा-स्वीकृत विभागात रोज सुमारे ३० लाखांची रोकड जमा व्हायची. ती हाताळण्याचा या विभागातील कर्मचाऱ्यांवर काहीसा तणाव येत होता. आता मात्र, ऑनलाईन सुविधेमुळे संबंधित रक्कम थेट बँक खात्यात जमा होत असल्याने तणाव, कामाचा अतिरिक्त भार कमी झाला आहे. काम अधिक सोपे झाले असल्याचे जमा स्वीकृती विभागाचे अधीक्षक सुभाष संकपाळ यांनी सांगितले. पूर्वी रोज किमान ४०० जण पैसे भरण्यासाठी येत होते. आता दिवसातून सरासरी १० जण येतात. त्यांच्यासाठी विभागात दोन संगणक उपलब्ध करून नव्या सुविधेची माहिती, थोडक्यात प्रशिक्षण देत असल्याचे तांत्रिक सहाय्यक सतीश हुक्केरी यांनी सांगितले.
...
‘ऑनलाईन फी भरण्याची सुविधा यंदा केवळ दीक्षान्त समारंभानिमित्त पदवी प्रमाणपत्र घेणाऱ्यांसाठी उपलब्ध होती. आता ही सुविधा सर्वांसाठी सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वेळ, पैशांची बचत झाली आहे.
- अजित चौगुले, वित्त व लेखाधिकारी
...

‘या ऑनलाईन रिसीट-पेमेंट सुविधेमुळे फी भरण्याची प्रक्रिया सोपी, सुटसुटीत झाली आहे. वेळ वाचत असून ही सुविधा आम्हा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारी आहे.
- सत्यजित पाटील, संशोधक विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com