रिपोर्ताज- ग्रामीण फुटबॉल

रिपोर्ताज- ग्रामीण फुटबॉल

86289

ग्रामीण फुटबॉलला पुन्हा ‘किक''
गायरानातील मैदानांवरच सराव; लोकवर्गणीतून मैदाने सुसज्ज

लीड
भल्या सकाळी उठून शाळेचं ग्राऊंड गाठायचं. सुरवातीला मैदानावरचे खडे आणि इतर स्वच्छता करायची. कोवळ्या उन्हाच्या साक्षीनं हळूहळू सारीच मंडळी मैदानावर एकवटतात आणि फुटबॉलचा थरार सुरू होतो. जिल्ह्यातील विविध गावांत हे चित्र दिसते. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश गावांतील मैदानं गायरानातच आहेत. त्यामुळेच त्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाचा निधी मिळू शकत नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावरच लोकवर्गणीतून मैदानांचा विकास सुरू आहे...
....................

अडचणींची ‘आघाडी’; पण...
निगवे दुमालातील खेळाडू ज्योतिर्लिंग हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी सराव करतात. पण, सध्या दहावी-बारावीची परीक्षा सुरू आहे आणि क्रिकेटचाही हंगाम सुरू आहे. कोरोनानंतर अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय बदलले. त्यामुळे त्यांचा फुटबॉल हळूहळू सुटला असला तरी अधून-मधून ते मैदानावर येतातच. मैदानापासून ते कीटपर्यंत आणि नोकरी- व्यवसायापासून ते करिअर म्हणून फुटबॉलची निवड करण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना करत ग्रामीण फुटबॉल पुन्हा बहरू लागला आहे...निगवे फुटबॉल क्लबचा नीलेश कुर्ले भरभरून सांगत असतो. सध्या सरावच बंद असल्यामुळं थोडी खंतही तो व्यक्त करतो.

लोकवर्गणी अन् ‘केएसए’कडे नोंदणी
सध्या (कै) डी. सी. नरके स्मृती राज्यस्तरीय ग्रामीण फुटबॉल स्पर्धेच्या संयोजनात व्यस्त असलेला सांगरूळ फुटबॉल क्लबचा संभाजी नाळे भेटतो. तो सांगतो, ‘आम्ही सांगरूळात लोकवर्गणीतून मैदानाचा विकास सुरू केला आहे. वर्षभर काम सुरू आहे. सध्या क्रिकेटचे सामने होत असले तरी फुटबॉलसाठी मैदान सज्ज नाही. आम्ही लोकवर्गणीतून मैदानांचा विकास सुरू केल्यानंतर जिल्ह्यातील दहाहून अधिक गावांत तसे प्रयत्न सुरू झाले. अडचणी असल्या तरी ग्रामीण फुटबॉल भविष्यात बहरणार आहे. विविध ग्रामीण फुटबॉल संघांतील सत्तरहून अधिक खेळाडूंची ‘केएसए’कडे नोंदणी आहे आणि हे संघ नामांकित संघाकडून मैदान गाजवत आहेत, हे नक्कीच अभिमानास्पद आहे. तीस मार्चपासून नरके स्मृतिचषक स्पर्धेच्या माध्यमातूनही ग्रामीण फुटबॉल खेळाडूंचे टॅलेंट अनुभवायला मिळेल.’

‘डे-नाईट''सामन्यांचा सुरू झाला थरार
गडहिंग्लज परिसर वगळता इतर ग्रामीण भागात फुटबॉल बहरू लागला दहा-बारा वर्षापूर्वीपासून. एकीकडे गावागावांत फुटबॉल संघ तयार होऊ लागले. २०१३ मध्ये पहिल्यांदा डे-नाईट फुटबॉल स्पर्धा भरवल्या आणि त्याला जिल्ह्यात संघांचा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर फुटबॉल खेळाडू आणि ग्रामीण भागात स्पर्धांची संख्याही वाढू लागली. पण, कोरोनामुळे दोन ते तीन वर्षे सर्व ठप्प झाले. यंदा केवळ चार ते पाचच मोठ्या स्पर्धा झाल्या. स्पर्धा संयोजनासाठी वाढलेला खर्च हे प्रमुख कारण असल्याचे वडणगे फुटबॉल क्लबचे अशोक चौगले, रविराज मोरे सांगतात. वडणगे शहराशेजारील मोठे गाव असले तरी फुटबॉलच नव्हे तर क्रिकेट आणि इतर सर्वच खेळाडूंनी मैदानाचा लोकवर्गणीतून विकास करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांच्या सहकार्यातूनच मैदान सज्ज होत आहे, असेही ते आवर्जून सांगतात.

मेस्सी-रोनाल्डो, नेमार, एम्बाप्पेही...
कोरोनानंतरच्या काळात संघातील खेळाडूंची संख्या थोडी फार कमी झाली. पण, आता पुन्हा संघांनी चांगली बांधणी केली आहे. सांगरूळ, उचगाव, वडणगे, निगवे, पीरवाडी, कुडित्रे, सांगरूळ, कोडोली, पन्हाळा, शिंगणापूर, बालिंगा, पाडळी, कोपार्डे, कसबा बीड, सावरवाडी, शिरोली दुमाला, बाचणी, केर्ली, आसगाव, पारगाव, कळंबा, शिरोली पुलाची गावांतील संघांबरोबरच गडहिंग्लज परिसरातील संघांचाही समावेश आहे. कोल्हापूरच्याच नव्हे तर जगातील फुटबॉलची क्रेझ खेळाडूंत आहे आणि म्हणूनच प्रत्येक संघात एखादा मेस्सी, रोनाल्डो, नेमार आणि आता एम्बाप्पेही हमखास असतोच असतो. शिरोली फुटबॉल क्लबचा संकल्प थोरवत, शुभम चव्हाण मेस्सी तर विनायक दबडे, गणेश मोहिते रोनाल्डो म्हणून ओळखले जातात. वाकरेचा रवी कांबळे मेस्सी तर मयूर पाटील रोनाल्डो, वडणगेचा ऋतूराज तांबेकर, सौरभ पाटील मेस्सी, शुभम लांडगे, सिध्देश मोरे नेमार तर मयूर वाळवेकर, विष्णू गोमाटे एम्बाप्पे, कुणाल शेलार रोनाल्डो समर्थक आहेत आणि त्यांच्या खेळालाही याच ऑयकॉन्सची भुरळ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com