
विद्यापीठात घडले जपानी कला-संस्कृतीचे दर्शन
86210
............
विद्यापीठात घडले जपानी कला-संस्कृतीचे दर्शन
पारंपरिक खेळ, संगीताचे सादरीकरण
कोल्हापूर, ता. १ ः जपानी ओरिगामी कला, पारंपरिक खेळ, वस्त्रपरंपरा, चित्रकला, संगीत आदींच्या साथीने शिवाजी विद्यापीठातला आजचा दिवस जपानमय होऊन गेला. त्यामुळे उपस्थित विद्यार्थी, शिक्षक भारावून गेले.
जपानच्या क्योतो सेइका विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थ्यांनी आज शिवाजी विद्यापीठास भेट दिली. विदेशी भाषा विभागातर्फे या विद्यार्थ्यांच्या साथीने विशेष कला-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आपल्या जपानी, रशियन भाषाकौशल्यासह त्या भाषांतील गीत-संगीताच्या ज्ञानाचे सादरीकरण केले. जपानी विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार प्रदर्शित केले. विद्यार्थ्यांनी स्वत: निर्मिलेली चित्रे, संगीत, शिल्पकला, व्हिडिओ, जपानी पारंपरिक वस्त्र डिझाईन, मांगा कॉमिक्स आदी विविध कलाविष्कारांचा स्थानिक विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. ओरिगामी, जपानी पारंपरिक खेळ केन्दामा यांची प्रात्यक्षिके दाखविली आणि उपस्थितांकडून करून घेतली.
शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा अधिविभाग, इंटरनॅशनल अफेअर्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने जपानी शिक्षक, विद्यार्थी भेटीचा कार्यक्रम आज आयोजित केला. त्याअंतर्गत समन्वयक सायुरी मात्सुनो आणि क्योतो सेइका विद्यापीठातील प्रा. शिन मात्सुमुरा, कोता तोदा, युको यासुइ, विविध विद्याशाखांचे विद्यार्थी रिन्तारो फुजिता, तेम्मा मियोशी, कोता योशिओका, रियोता सकामोतो, केन योशिकावा, त्सुमुगी निशिमुरा, मोएको नाइतो, युकिका नारादाते, कुणाल मात्सुनो यांचा या प्रतिनिधी मंडळात समावेश होता. समन्वयक मात्सुनो, प्रा. मात्सुमुरा, यांनी डॉ. मेघा पानसरे व इंटरनॅशनल अफेअर्स सेलचे संचालक प्रा. एस. बी. सादळे यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची भेट घेतली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता प्रा. श्रीकृष्ण महाजन उपस्थित होते. त्यानंतर वि. स. खांडेकर भाषा भवन येथील सभागृहात कला-सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
...
सामंजस्य करार करता येईल
‘भाषा, मानव्यशास्त्र, विज्ञान, माहिती-तंत्रज्ञान, ॲनिमेशन, संगीत अशा विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना जपानमध्ये भवितव्य आहे’, असे मत मात्सुनो व मात्सुमुरा यांनी व्यक्त केले. त्यावर, ‘क्योतो सेइका विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठामधील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रम, विद्यार्थी-शिक्षक भेट, ऑनलाईन व्याख्याने अशा उपक्रमांसाठी परस्पर सामंजस्य करार करता येऊ शकेल’, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.