अंबाबाई मंदिर व्यापारी पत्रपरिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाबाई मंदिर व्यापारी पत्रपरिषद
अंबाबाई मंदिर व्यापारी पत्रपरिषद

अंबाबाई मंदिर व्यापारी पत्रपरिषद

sakal_logo
By

कपिलतीर्थ मार्केट ताब्यात
घेऊन तेथे भाविकांना सुविधा द्या

व्यापाऱ्यांची भूमिका ः दीडशेहून अधिक जणांनी कळवला नकार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे कपिलतीर्थ मार्केटमध्ये भाविकांसाठी विविध सुविधा देता येणे शक्य आहे. त्याशिवाय फरासखाना आणि शेतकरी संघाची इमारत ताब्यात घेऊन तेथेही विविध सुविधा देता येणे शक्य आहे. मंदिर परिसरातील दीडशेहून अधिक व्यापारी व रहिवाशांनी देवस्थान समितीच्या विनंतीपत्रांना नकार असल्याचे पत्राने कळवले असल्याची माहिती आज महाद्वार व्यापारी असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. माजी नगरसेवक अजित ठाणेकर, असोसिएशनचे अध्यक्ष किरण नकाते, कार्याध्यक्ष जयंत गोयानी आदींनी ही माहिती दिली.
भाविकांना विविध सुविधा देण्यासाठी देवस्थान समितीने मंदिर परिसरातील व्यापारी व रहिवाशांना जमिनी देण्याबाबतची विनंती पत्रे पाठवली आहेत. या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद झाली.
कपिलतीर्थ मार्केटची सुमारे दीड एकरपेक्षा अधिक जागा आहे. या परिसरात नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून नियोजित विकास शक्य आहे. भाजी मंडई आणि सध्याची दुकाने आहे तशी ठेवून फेरीवाला मार्केट, प्रसादालय, मोठे पार्किंग, भक्त निवास आदी सुविधा येथे सहजशक्य आहेत. देवस्थान समितीने ताराबाई रोडवरील जागेचे बांधकाम सुमारे चार वर्षांपूर्वी सुरू केले. ते तत्काळ पूर्ण करावे लागणार आहे. यापूर्वी महानगरपालिकेने ताराबाई रोडवरील काही घरांच्या जागा घेऊन पार्किंग करण्याचा प्रयत्न केला. पण, तेथे सद्यस्थिती वेगळी आहे. महाद्वार रोड ही कोल्हापूर शहराची सर्वात जुनी व मध्यवर्ती बाजारपेठ असून, त्यावर शहराचे मोठे अर्थकारण अवलंबून आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा खरेदी करणे व विकास योजना राबवणे या गोष्टी समितीच्या उपविधीच्या कक्षेबाहेरच्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आजवर देवस्थान समितीला सर्वतोपरी सहकार्य केले आहे. मात्र, जागा विकत देण्याला सध्या तरी विरोध आहे. वारंवार मंदिर परिसरातील पाचशे व्यापारी आणि त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर टांगती तलवार ठेवू नये, असेही ते म्हणाले. यावेळी मनोज बहिरशेठ, अमित माने, विनित कटके, जयंत भुर्के, संजय हावळ आदी उपस्थित होते.
............

पंधरा मार्चपर्यंत मुदत

देवस्थान समितीने मंदिर परिसरातील व्यापारी व रहिवाशांना २७ फेब्रुवारीपर्यंत जागा देणेबाबतची विनंती पत्रे दिली आहेत. त्यांना लेखी किंवा वैयक्तिक म्हणणे मांडण्यासाठी दोन मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण, ही मुदत आता वाढवली असून, पंधरा मार्चपर्यंत म्हणणे सादर करता येणार आहे. अधिक माहितीसाठी देवस्थान समितीच्या मंदिरातील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.