विनापरवाना बांधकाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनापरवाना बांधकाम
विनापरवाना बांधकाम

विनापरवाना बांधकाम

sakal_logo
By

विनापरवाना बांधकामप्रश्नी
आठ जणांविरोधात गुन्हा
कोल्हापूर, ता. १ ः विनापरवाना केलेले बांधकाम काढून घेण्याच्या नोटिसा देऊनही बांधकाम काढले नसल्याने महापालिकेच्या नगररचना विभागाकडून आज शिवाजी पेठेतील आठ जणांविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातून शहरातील अनधिकृत तसेच विनापरवाना बांधकामांबाबत बऱ्याच कालावधीनंतर कारवाई करण्यास महापालिकेने सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
बांधकाम परवानगी न घेता तसेच कमी जागा असताना जास्त जागेवर बांधकाम करणे, अशा अनेक तक्रारी महापालिकेच्या नगररचना विभागात कुणी नावानिशी, कुणी निनावी सातत्याने करीत असतात. त्याची खात्री करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असल्याने पाहणी करून संबंधितांना नोटीस काढली जाते. त्यातून काही वेळा मिळकतधारक अनाधिकृत बांधकाम काढून घेतो. पण, बहुतांश वेळेस त्याबाबत फार मोठी कारवाई होत नाही. काही दिवस गेल्यावर प्रकरण विस्मृतीत जाते. शिवाजी पेठेतील सिटी सर्व्हे नंबर ६४१, ६४२, ६४३ मध्ये बांधकाम केलेल्या प्रकाश परशुराम कुरणे, विनोद वसंत कुरणे, धनंजय विनायक कुरणे, महादेव राणोजी कांबळे, गणेश महादेव कांबळे (पोर्लेकर), रुक्मिणीबाई महादेव माने, श्रीपती दत्तू दाभाडे, रंगराव बाळू भोसले यांना नगररचना विभागाने नोटीस देऊन बांधकामे काढून घ्यावीत, असे कळविले होते. त्यांनी जून २०२२ पूर्वी बांधकामे केली आहेत. नोटिसा देऊनही बांधकाम काढले नसल्याने आज त्यांच्यावर नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता सुनील भाईक यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ अन्वये गुन्हा दाखल केला. नगररचना विभागाकडे अनेक प्रकरणे कारवाई करण्याच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे आज गुन्हा नोंद करून त्या दिशेने कारवाईला सुरुवात केल्याचे दिसत आहे.