संजय राऊत मेळावा बातमी

संजय राऊत मेळावा बातमी

86280
.....

गद्दारांना गाडून शिवसैनिक भगवा फडकवतील

संजय राऊत ः शिवगर्जना मेळाव्यात नरकेंसह दोन्ही खासदारांवर टीका

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १ ः ‘करवीरचे चंद्रदीप नरके आणि शिवसेनेतून फुटलेले दोन खासदार, आमदार हे टेस्टट्यूब बेबी आहेत. शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून तुम्हाला निवडून आणले, पण तुम्ही त्याच शिवसैनिकांचा विश्वासघात केला. कोल्हापूरची जनता पुरोगामी आणि स्वाभिमानी आहे. ती गद्दारांना स्वीकारत नाही. कोल्हापूर उत्तरसह सर्वच गद्दारांना गाडून त्यांच्या छाताडावर शिवसैनिक भगवा फडकवतील,’ अशी घणाघाती टीका शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या शिवगर्जना मेळाव्यात आज ते बोलत होते.
खासदार राऊत म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरेंनी माकडांची माणसे केली. त्याच माणसांचे सरदार घडवले. त्याच सरदारांनी पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेबांनी आम्हाला निवडले, घडवले. ते नसते तर देशाला संजय राऊत कधीच कळला नसता. महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला. कोल्हापूरची जनता गद्दारांना कधीच निवडणार नाही.’
प्रास्ताविक शिवसेना शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी केले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, ‘ज्यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी जिवाचे रान केले, त्यांनी शिवसैनिकांचा विश्वातघात केला. शिवसेना सोडताना त्यांना काहीही वाटले नाही, पण इथला शिवसैनिक खंबीर आहे. उत्तर हा शिवसेनेचा गड आहे. मला उमेदवारी मिळाली तर पुन्हा उत्तरमधून शिवसेनेचा आमदार होईल.’
कोरोनाकाळात उद्धव ठाकरे यांनी केलेले काम जनतेपर्यंत पोहचवा, असे अवाहन शिवसेना नेते अरुण दुधवडकर यांनी केले. मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव म्हणाल्या, ‘ठाकरे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ठाकरे आहेत. तुम्ही चिन्ह, पक्ष चोरू शकाल, पण मनातील शिवसेना कशी काढून नेणार?’
यावेळी करवीर तालुकाप्रमुख तानाजी आंग्रे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, कमलाकर जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मंजित माने यांनी केले. जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह या मेळाव्याला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----

... तरी कमळाबाई गप्प का?

‘कणेरी मठावर मुख्यमंत्री आले. त्यांनी गायीला चारा दिला. एरवी गोरक्षा विषयावर ‘मॉबलिंचिंग’ करणारे आता गप्प का? गायींच्या मृत्यूप्रकरणी कमळाबाई आणि हिंदुत्त्वाच्या नावाखाली तिकडे गेलेले गप्प का?’ असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
-------
‘करवीर’चा चंद्र मावळला

यावेळी संजय पवार म्हणाले, ‘करवीरचा लबाड मातोश्रीच्या पायऱ्या झिजवायचा. मग त्याला तिकीट मिळाले. शिवसैनिकांनी निवडून आणले, पण त्याने गद्दारी केली. करवीरचा चंद्र आता कायमचा मावळला.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com