
धरणग्रस्त आंदोलन
धरणग्रस्तांची ७ मार्च
डेडलाईन : डॉ. पाटणकर
कोल्हापूर, ता. १ ः धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांबाबत ७ मार्चपर्यंत शासन निर्णय झाला नाही तर या आंदोलनात श्रमीक मुक्ती दलाच्या सर्व संघटनांना उतरवू असा इशारा श्रमीक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी आज दिला.
श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने चार दिवसांपासून धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी श्री. पाटणकर यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,‘अन्यायी आदेश रद्द करून पुनर्वसनाला चालना देणारे निर्णय घ्यावेत. त्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. सहा तारखेला होळी आहे. त्यादिवशी आंदोलक सरकारच्या नावाने शिमगा करतील. दुसऱ्या दिवशी होळीची राख कपाळाला लावून आंदोलनाचा पुढचा टप्पा जाहीर करतील. ७ मार्चपर्यंत हे आदेश निघाले नाहीत तर ८ मार्चपासून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त, समविचारी चळवळी त्या-त्या ठिकाणी आंदोलन सुरू करतील.’ यावेळी नजीर चौगुले, मारूत पाटील, सखाराम पाटील, शंकर पाटील आदिंची भाषणे झाली. संतोष गोटल, डी. के. बोडके, जगन्नाथ कुडतूडकर, पांडूरंग कोठारी, दाऊद पटेल, बाळू पाटील, पांडूरंग पोवार आदि यावेळी उपस्थित होते.