जयशंकर दाणवे पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयशंकर दाणवे पुरस्कार
जयशंकर दाणवे पुरस्कार

जयशंकर दाणवे पुरस्कार

sakal_logo
By

कोल्हापुरातच मिळाले आयुष्याला वळण
---
अभिनेते सचिन; नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओत ‘हा मार्ग माझा एकला’ या चित्रपटाचे चित्रीकरण झाले. या चित्रपटात मी केलेल्या भूमिकेला उत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्‍ट्रीय स्तरावरील पुरस्कार लाभला. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या कोटाचे गुलाबपुष्‍प माझ्या शेरवाणीला लावले. ‘बडा बनोगे’ अशी शाबासकी दिली. तेथून माझ्या आयुष्याला वळण लागले. त्याची सुरुवात कोल्हापुरातून झाली. त्याच कोल्हापुरात मिळालेला कलायात्री पुरस्कारही मला ऊर्जा देतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी आज येथे केले.
नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार सचिन पिळगावकर यांना प्रदान करण्यात आला. या वेळी प्रा. सुजय पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
सचिन म्हणाले, की वयाच्या तिसऱ्या वर्षी मी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. येथील जयप्रभा स्टुडिओत अभिनेते शाहू मोडक व अभिनेत्री उषा किरण यांच्या मुलाची भूमिका साकारण्याची संधी मला लाभली. मात्र, काही कारणाने माझी भूमिका नाकारली गेली. अशा नकारातून मला काही तरी नवे शिकण्याची ऊर्जा लाभली. तेव्हापासून नवे शिकण्याची जिज्ञासा ठेवून मोठ्या कलाकारांकडून सतत काहीतरी नवीन शिकत गेलो. अशी शिकण्याची प्रक्रिया आज वयाच्या पन्नाशीनंतर कायम ठेवली आहे. त्याचा उपयोग झाला. त्यामुळे मराठी, हिंदी, भोजपुरीसह अन्य भाषांतही चित्रपटात भूमिका करता आल्या.
ते म्हणाले, की बालवयात अभिनय क्षेत्रात काम करताना नटश्रेष्ठ जयशंकर दानवे, राजा परांजपे, ऋषीकेश मुखर्जी, मीना कुमारी आदी दिग्गज कलावंत गुरू म्हणून लाभले. त्यांच्याकडून अनेक सूक्ष्म बारकावे शिकता आले. आजही मी माझ्यापेक्षा लहान कलावंतांकडूनही नवीन काही शिकत असतो. अशा कलाकारांबरोबर मैत्रीही मी जपली आहे. यातून निर्माण झालेले आपुलकीचे नाते मला आपलेसे वाटते.
‘शोले’ चित्रपटाची आठवण सांगताना सचिन म्हणाले, की अभिनेते अमजद खान यांना दिग्दर्शकाने भूमिकेसाठी नकार दिला होता. मात्र, त्यांना संवादफेकीचे चढ-उताराचे प्रशिक्षण दिले. त्या आधारे त्यांनी त्यांच्या आवाजात केलेली ‘शोले’ चित्रपटाची डॉयलॉगबाजी जगप्रसिद्ध आहे. त्याच बळावर ते ‘शोले’ चित्रपटातील खरे नायक ठरले. म्हणून कोणत्याही कलाकाराला कधीही कमी लेखू नये.
या वेळी जयश्री दानवेलिखित ‘दिल शायराना’ , ‘अब्द अब्द ’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन सचिन यांच्या हस्ते झाले.