शिक्षकांचा ‘बहिष्कार’ मागे, उत्तरपत्रिका तपासणी सुरू होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांचा ‘बहिष्कार’ मागे, उत्तरपत्रिका तपासणी सुरू होणार
शिक्षकांचा ‘बहिष्कार’ मागे, उत्तरपत्रिका तपासणी सुरू होणार

शिक्षकांचा ‘बहिष्कार’ मागे, उत्तरपत्रिका तपासणी सुरू होणार

sakal_logo
By

86445

शिक्षकांचा ‘बहिष्कार’ मागे,
उत्तरपत्रिका तपासणी सुरू होणार

मागण्या मान्य झाल्याने महासंघाचा निर्णय

कोल्हापूर, ता. २ : महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्याने राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनावर बहिष्कार आंदोलन आज मागे घेतले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा झाली. आंदोलन थांबल्याने उत्तरपत्रिका तपासणीचे काम दोन दिवसांत सुरू होणार आहे.
प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महासंघाने आठ दिवसांपूर्वी ‘बहिष्कार’ आंदोलन सुरू केले. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प झाले. त्यावर मंत्री केसरकर यांनी आज महासंघाच्या शिष्टमंडळासमवेत मुंबई येथे चर्चा केली. त्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबात उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. आश्वासित प्रगती योजनेबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे आजच सादर करण्यात आला. २१४ व्यपगत पदांबाबात शासन आदेश १५ दिवसांत निर्गमित करण्यात येईल. आयटी विषय नियुक्ती मान्यता प्राप्त शिक्षकांना अनुदानित पद मान्यता आणि वेतनश्रेणी लागू करण्यातबाबत वित्त विभागाकडे पुढील १५ दिवसांत प्रस्ताव सादर केला जाईल. इतर मागण्यांबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येतील, अशी ग्वाही मंत्री केसरकर यांनी दिली. त्यामुळे महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेतले असल्याची माहिती राज्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, समन्वयक प्रा. मुकुंद आंदळकर यांनी दिली. मुख्य सचिव रणजितसिंह देओल, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, राज्य महासंघाचे संतोष फाजगे, अविनाश तळेकर, विलास जाधव उपस्थित होते.

चौकट
मूल्यमापनाचे काम सुरू करणार
महासंघाच्या आदेशानुसार कार्यवाही करत आम्ही कोल्हापूर विभागातील उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे काम सुरू करणार आहोत. मुख्य नियामक, नियामकांच्या बैठकीनंतर कामाचा प्रारंभ होईल, असे कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा. अभिजित दुर्गी यांनी सांगितले.