जन्म-मृत्यू नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जन्म-मृत्यू नोंद
जन्म-मृत्यू नोंद

जन्म-मृत्यू नोंद

sakal_logo
By

जन्म-मृत्यू नोंदणी यंत्रणा विस्कळीत
नागरिकांचे हेलपाटे; नवीन सॉफ्टवेअरमुळे दमछाक, कर्मचाऱ्यांची वाणवा
उदयसिंग पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : बदललेले सॉफ्टवेअर, जुन्या नोंदींची नऊ लाखांच्या आसपास संख्या, कर्मचाऱ्यांची वाणवा या साऱ्यांमुळे कामाच्या वाढलेल्या ताणामुळे महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील यंत्रणा विस्कळीत झाली आहे. २०१६ पूर्वीची प्रमाणपत्रे देण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. त्यात सुटी, इतर अडचणी आल्यास आठवडा होतो. यामुळे नागरिकांचे हेलपाटे वाढत आहेत.
महापालिकेकडे असलेले सॉफ्टवेअर बदलून देशभरात एकच सॉफ्टवेअर करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाकडून दिला होता. त्याची अंमलबजावणी होण्यास ऑगस्ट २०२२ उजाडले. त्यामुळे मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांचा समावेश असलेले प्रमाणपत्र दिले जाऊ लागले. ही बाब नागरिकांच्यादृष्टीने सोयीची आहे; पण प्रशासनासमोर अडचणींचा डोंगर निर्माण झाला आहे. दवाखान्यातून दररोज येणारे अर्ज त्या-त्या नागरी सुविधा केंद्रातून सॉफ्टवेअरमध्ये भरले जात आहेत. जानेवारी २०२२ पर्यंतच्या नोंदी झाल्या आहेत. इंग्रजीतून नाव लिहिले गेल्यास मराठीतील नावात चुका राहतात. त्यामुळे अशा नोंदी महापालिकेतील नोंदणी विभागातील अधिकारी अर्ज पाहून अंतिम करतात. ते करत असताना दररोज येणाऱ्या प्रमाणपत्राच्या मागणीचे अर्जही तपासण्याचे काम असते. त्यासाठी दोन अधिकारी व दोन कर्मचारी आहेत. त्यांच्यावर कामाचा ताण वाढलेला आहे.
तसेच २०१६ पूर्वीच्या जवळपास नऊ लाख नोंदी महापालिकेने यापूर्वीच्या सॉफ्टवेअरमध्ये केल्या आहेत. त्या नोंदी नव्या सॉफ्टवेअरमध्ये रूपांतरीत करण्याचा प्रयत्न केला गेला; पण ते झाले नसल्याने आता त्या सर्व नोंदी कर्मचाऱ्यांकरवी नव्या सॉफ्टवेअरमध्ये करून घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले. नियमित नोंदी व त्यांचे प्रमाणपत्र देण्यासाठी यंत्रणा पुरेशी नाही. त्यामुळे २०१६ पूर्वीच्या नोंदी करणे सध्या उपलब्ध असलेल्या यंत्रणेला शक्य नाही. त्यासाठी जादा मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे.
---------------
चौकट
गंभीर चुकांची शक्यता
पूर्वीच्या नऊ लाखांच्या आसपास नोंदीचे काम वेगळ्या कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात येणार आहे. तोपर्यंत चार महिने तुम्ही करून द्या, असे सांगून महापालिका प्रशासनाने जानेवारीपर्यंतचे काम नागरी सुविधा केंद्रातील ३५ कर्मचाऱ्यांकडून करून घेतले जात आहे. दररोज किमान १५० ते २०० नोंदी विविध केंद्रावरून ते करतात. इतर कामेही केली जातात. पूर्वीच्या नोंदीसाठी ठोकमानधनावरील, कंत्राटी कर्मचाऱ्यांना शनिवार, रविवार सुटीच्या दिवशीही बोलवून घेतले जात आहे. सतत काम करण्यामुळे अशा माहिती भरण्याच्या कामात गंभीर चुका होण्याची दाट शक्यता आहे. त्या चुकांमुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.