
केएटीपीमधील वाहन पासिंग ट्रॅकला मंजुरी
केएटीपीमधील वाहन पासिंग ट्रॅकला मंजुरी
आमदार आवाडे यांची माहिती ः दोन तालुक्यांतील वाहनधारकांची होणार सोय
इचलकरंजी, ता. २ ः इचलकरंजी शहरासह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांसाठी उपयुक्त तारदाळ येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट ॲण्ड इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) या संस्थेतर्फे स्वखर्चातून उभारलेला ब्रेक टेस्ट ट्रॅक सुरू करण्यास राज्य शासनाच्या गृह विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या निर्णयाने वाहनधारकांच्या जिव्हाळ्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
जिल्ह्यातील एकूण वाहनसंख्येपैकी हातकणंगले व शिरोळ तालुक्यात ४५ टक्के वाहने आहेत. त्यामध्ये रिक्षा, लहान टेम्पो, तीनचाकी टेम्पो प्रकारातील वाहने अधिक आहेत. या वाहनांच्या पासिंगसाठी शहर व परिसरात ट्रॅक उपलब्ध नसल्याने सर्वांना कोल्हापूर येथील आरटीओ कार्यालयात जावे लागते. तर पासिंग ट्रॅक, मोरेवाडी येथे असल्याने तेथे जावून पासिंग करावे लागते. पासिंगवेळी वाहनात दोष आढळल्यास तो पूर्ण दिवस वाया जातो. शिवाय रिक्षा व टेम्पो चालकांचे जवळपास दोन ते तीन दिवस वाया जातात. त्यामुळे पासिंग ट्रॅकची गरज ओळखून तारदाळ येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट अॅन्ड इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क या संस्थेची जागा उपलब्ध करुन तेथे नियमानुसार ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करुन देण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ट्रॅक तयार करण्यास शासनाकडून मान्यता दिली. त्यानंतर परिवहन विभाग व आरटीओच्या नियम व निकषानुसार पासिंग ब्रेक टेस्ट तयार करुन घेतला. मात्र २०१८-१९ पासून हा ट्रॅक सुरु होण्याची प्रतीक्षा होती. हा ट्रॅक तातडीने सुरु करताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. प्रसंगी आंदोलनही करावे लागले होते. मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रश्नी पुन्हा पाठपुरावा सुरु केला. त्याला अखेर मंजूरी मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर यांचे यासाठी सहकार्य लाभले. या ट्रॅकमुळे वाहनधारकांच्या कोल्हापूर येथे माराव्या लागणाऱ्या फेऱ्यांसह वेळेची आणि पैशांची बचत होणार आहे, असेही आमदार आवाडे यांनी सांगितले.