अरूण नरके फाऊंडेशन व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अरूण नरके फाऊंडेशन व्याख्यान
अरूण नरके फाऊंडेशन व्याख्यान

अरूण नरके फाऊंडेशन व्याख्यान

sakal_logo
By

86425
कोल्हापूर : अरुण नरके फाउंडेशनतर्फे आयोजित व्याख्यानात बोलताना व्याख्याते गणेश शिंदे. समोर उपस्थित विद्यार्थी. (नितीन जाधव : सकाळ छायाचित्रसेवा)

अधिकारी झाल्यानंतर सामान्यांना विश्‍वासात घ्या
गणेश शिंदे; नरके फाउंडेशनतर्फे स्पर्धा परीक्षार्थींसाठी व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : स्पर्धा परीक्षा देऊन तुम्ही अधिकारी व्हाल, मात्र अधिकारी झाल्यानंतर कोणीही सामान्य माणूस तुमच्याकडे घाबरत नाही आला पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण करा, सामान्यांचा विश्‍वास संपादन करा, असा संदेश युवा व्याख्याते गणेश शिंदे यांनी विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थींना दिला. अरुण नरके फाउंडेशनतर्फे संस्थापिका विश्‍वस्त सुनिता नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त जीवन सुंदर आहे, या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, ‘‘अधिकाऱ्यांच्या सहीमध्ये मोठी ताकद आहे. या ताकदीचा वापर चांगल्या कार्यासाठी करा. समाजाच्या विकासासाठी करा. जगणं सुंदर करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे शिक्षण. ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. ज्ञानामुळेच स्वतःला सिद्ध करता येते. जीवन सुंदर करण्यापूर्वी स्वतःला सिद्ध करायला हवे. त्यामुळेच शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहा. हल्ली साधनांनी माणसाचे आयुष्य सुंदर झाले आहे, असं मानलं जातं. जगणं हे साधनांनी सुंदर होत नाही. साधनांमुळे माणसाचे जगणे सोपे, सुलभ होईल; पण सुखी कदापिही होणार नाही. प्रत्येकाचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आपल्याकडील वेगळेपण ओळखता यायला हवे. दुसऱ्याच्या नजरेतून जग पाहू नका. व्यक्त होण्याची बरीच साधने आहेत. व्यक्त होताना मात्र आपण कसे, कुठे व्यक्त होतो आहे याचा विचार करा. आपल्या व्यक्त होण्यामुळे कोणाच्या भावना दुखावतात का, याचा विचार करायला हवा. व्यक्त होण्यासाठी साधने उपलब्ध आहेत; मात्र या साधनांमुळे स्‍वास्थ्य हरपले आहे.’’
दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला अरुण नरके फाउंडेशनच्या स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना गणेश शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष चेतन नरके, अरुण नरके, बाळ पाटणकर, अजय नरके, दिलीप नरके, रवींद्र ओबेरॉय उपस्थित होते. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले.
--------
गणेश शिंदे म्हणाले
- हो मध्ये हो मिसळू नका
- विवेकबुद्धी जागृत ठेवा
- व्यक्त व्हायला शिका
- नवं तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे
- नात्यांना किंमत द्या