करवाढ नसलेल्या अंदाजपत्रकाला मंजूरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करवाढ नसलेल्या अंदाजपत्रकाला मंजूरी
करवाढ नसलेल्या अंदाजपत्रकाला मंजूरी

करवाढ नसलेल्या अंदाजपत्रकाला मंजूरी

sakal_logo
By

करवाढ नसलेल्या अंदाजपत्रकाला मंजुरी
आजरा नगरपंचायत; छत्रपती शिवरायांचा पुतळा अनावरणला ५ लाखांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३ ः आजरा नगरपंचायतीच्या विशेष सभेत आज शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. यामध्ये कोणतीही करवाढ केलेली नसलेला, सुधारित व अंदाजित अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. २० कोटी ८ लाख ९९ हजार ७५३ रुपयांच्या व ७ लाख ९२ हजार ७९७ रुपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर केले. छत्रपती शिवरायांचा पुतळा अनावरण कार्यक्रमाला ५ लाखांची तरतूद करावी, अशी मागणी नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी केली.
येथील नगरंपचायतीच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत २०२२-२३ सुधारित व २०२३-२४ चे प्रस्तावित अंदाजपत्रकावर चर्चा झाली. नगरलेखापाल प्रवीण पाटील यांनी अंदाजपत्रक सादर केले. अंदाजपत्रकामध्ये भांडवली व महसुली २० कोटी ८ लाख ९९ हजार ७५३ इतकी जमा अपेक्षित असून तर भांडवली व महसुली एकूण २० कोटी १ लाख ६९५६ इतका खर्च आहे. यामध्ये ७ लाख ९२ हजार ७९७ शिल्लक राहणार आहे. या अंदाजपत्रकात विशेष तरतुदी केलेल्या नाहीत. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी अध्यक्षस्थानी होत्या.
छत्रपती शिवरायांचा पुतळा अनावरण कार्यक्रमाला ५ लाखांची तरतूद करावी; तसेच नगरपंचायतीच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी १० लाखांची तरतूद करावी, अशी मागणी नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी केली. शिंपी म्हणाले, ‘‘गुंठेवारीचा कोणताही आदेश झालेला नसताना गुंठेवारीचे उत्पन्न अंदाजपत्रकात नियोजित दाखवले आहे. जे होणार नाही ते करणे चुकीचे आहे. गुंठवारी, पार्किंग व कोरोना दंड यांसह अनेक उत्पन्नाचे स्त्रोत दाखवून अर्थसंकल्प फुगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे चुकीचे आहे. अर्थसंकल्पात वस्तुनिष्ठता असावी.’’ त्यांनी छोटे मोठे बदल सुचवले.
नगरसेवक आनंदा कुंभार म्हणाले, ‘‘मटण मार्केट व कत्तलखान्याचा कर स्वतंत्रपणे जमा करावा.’’ नगरसेवक विलास नाईक म्हणाले, ‘‘नगरपंचायतीच्या गाळ्यांचे वेळेत भाडे जमा करावे.’’ ज्येष्ठ नगरसेवक अशोक चराटी, शुभदा जोशी, यास्मिन बुड्डेखान, किरण कांबळे यांनी सूचना मांडल्या. या वेळी नगरसेवक सुमैय्या खेडेकर, रेश्मा सोनेखान, यासीराबी लमतुरे, शकुंतला सलामवाडे उपस्थित होत्या. मुख्याधिकारी संदीप घारगे, प्रशासकीय अधिकारी राकेश चौगुले आदी उपस्थित होते. वरिष्ठ कारकून संजय यादव यांनी आभार मानले.
-----------------
* तेरा प्रमुख तरतुदींना मंजुरी
शिक्षण, कला क्रीडा निधी, महिला व बालकल्याण समिती, दुर्बल घटक कल्याण निधी, दिव्यांग निधी यासाठी पाच टक्के तरतूद केली. त्याचबरोबर गटारे व नाले, रस्ते व पदपथ, इतर स्थिर मालमत्ता, पाणीपुरवठा पद्धती, वीज संच मांडणी (सौर ऊर्जा प्रकल्प), घनकचरा प्रकल्प (डीपीआर), अग्निशमन वाहने, इतर वाहने, फर्निचर आणि खिळण्या याही तरतुदी केल्या असून त्यांना मंजुरी दिली.