
शिवसेना संपली नाही; संपणार नाही
ich21.jpg
86497
इचलकरंजी ः श्रीमंत ना.बा. घोरपडे नाट्यगृहातील शिवगर्जना मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. मंचावर मुरलीधर जाधव, अरुण दुधवडकर, महादेव गौड, सुजीत मिणकेचकर आदी उपस्थीत होते.
----------
शिवसेना संपली नाही; संपणार नाही
खासदार संजय राऊत; इचलकरंजीत येथे शिवगर्जना मेळावा
इचलकरंजी, ता. २ ः शिवसेना संपली की महाराष्ट्राची अस्मिता संपणार असा डाव विरोधकांकडून आखला जात आहे. पण किती गद्दार आले आणि गेले तरीही शिवसेना संपली नाही आणि संपणार नाही. ज्यांना पक्षाने खांद्यावर घेऊन वाढवले त्याच खांद्यावरुन गद्दारांची तिरडी नेल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, अशी गर्जना खासदार संजय राऊत यांनी केली. येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने आयोजित शिवगर्जना मेळाव्याला संबोधित करताना खासदार ते बोलत होते.
खासदार राऊत म्हणाले,त''पन्नास वर्षांपूर्वी हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारून शिवसेनेची स्थापन केली नव्हती. त्यामुळे शिवसेना ही एकच असून दुसरी निर्माण होऊच शकत नाही. स्वाभिमानाच्या ठिणगीने पेटलेला वणवा कोणालाही विझवता येणार नाही. आता पुण्याच्या निवडणुकीत आम्ही त्यांच्यासोबत नसल्यामुळे त्यांचा गड कोसळला. ही भविष्याची नांदी असून आगामी काळात गद्दारांपैकी एकजणही निवडून येणार नाही. हातकणंगले लोकसभा मतदार संघांमध्ये धैर्यशील माने यांना खासदार करून शिवसेनेने प्रेम दिले. पण, ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केलेल्या या खासदाराला आगामी निवडणूकीत जनता पराभूत करेल.’
माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, प्रवक्ते लक्ष्मण हाके, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर आदींनी मनोगत व्यक्त केले. शिवसेना पक्ष आणि चिन्ह पळवून नेले असले तरी त्यांना शिवसेनेसारखे प्रेम, निष्ठा कुठेही मिळणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांत या गद्दारांना जनताच त्यांची जागा दाखवून देतील, असा इशारा या वक्त्यांनी दिला. प्रारंभी शहरप्रमुख सयाजी चव्हाण यांनी स्वागत तर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी प्रास्ताविक केले. आभार उपजिल्हाप्रमुख महादेव गौड यांनी मानले. अस्लम शेख, साताप्पा भवान, मधूकर पाटील, आनंद शेट्टी, बाजीराव पाटील, वैभव उगळे, शिवाजी पाटील, आण्णासो बिल्लूरे, मंगल चव्हाण, सलोनी शिंत्रे, शिवानंद हिरेमठ, विजय देवकर, अस्लम खलीफा, इस्माईल शेख, शोभा कोलप, शोभा गोरे, महेश बोरा आदी उपस्थित होते.
----
वस्त्रनगरीत जल्लोषात स्वागत
खासदार राऊत यांचे इचलकरंजीत आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी केली. त्यांचे जल्लोषात स्वागत केले. शिवतीर्थ येथे खासदार राऊत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मोटरसायकली रॅली काढली.