
आमदार सतेज पाटील विधान परिषदेचे गटनेते
काँग्रेसच्या विधान परिषद
गटनेतेपदी सतेज पाटील
कोल्हापूर, ता. ३ : माजी गृह राज्यमंत्री व विधान परिषद सदस्य सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची आज काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी ही नियुक्ती केल्याचे जाहीर केले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी सभागृहात त्यांच्या निवडीची घोषणा केली.
सतेज पाटील यांनी जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीस चालना दिली आहे. ते, २००९-१४ च्या आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्याचबरोबर २०१९ च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहराज्यमंत्री, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन अशा विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेसला चालना दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांनी पक्षाचा ठसा उमटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे अत्यंत नावीन्यपूर्ण पध्दतीने प्रसारण करून श्री. पाटील यांनी सर्व काँग्रेस जनांचे लक्ष वेधले होते.
काँग्रेसने आजपर्यंत दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आता पक्षाने गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. या पदालाही न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल सर्व वरिष्ठांचे आभार.
- सतेज पाटील, आमदार