
सीपीआर कर्मचारी निवेदन
त्या कामगारांना किमान वेतन बोनस द्यावा
कोल्हापूर , ता. २ ः सीपीआरमध्ये खासगी कंपनीच्या ठेकेदारांकडे काम करणाऱ्या दोनशेवर सफाई कामगारांना किमान वेतन व बोनस द्यावे, तसेच कामावरून कमी केलेल्या सफाई कामगारांना कामावर घ्यावे, या मागणीचे निवेदन सहायक कामगार आयुक्तांना देण्यात आले. कोल्हापूर शहर सर्व पक्षीय असंघटित कामगार अन्याय निवारण समिती यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनातील माहिती अशी की, सीपीआर रुग्णालयातील सफाई कामगारांचा ठेका खासगीकडे आहे तेथे काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतन व बोनस दिला जात नाही, अशात कामगारांनी घटनेने दिलेल्या अधिकारानुसार संघटना बांधली, तसेच किमान वेतनाची मागणी केली तेव्हा ठेकेदाराने काही महिला कामगारांना कामावरून कमी केले. असा प्रकार यापूर्वी अनेक वेळा घडला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार कंपनीकडून सफाई कामगारांना किमान वेतन व बोनस दिला जातो की नाही, तसेच कामगाराविषयी असलेल्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही, याची सखोल चौकशी करावी, तसेच कामगारांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी यात आहे.
माजी महापौर आर. के. पोवार, ॲड. बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, अशोक भंडारे, संदीप देसाई यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.