
शहर
सर्वाधिक प्रदूषित हवेच्या
शहरांमध्ये कोल्हापूर
लोकसभेच्या प्रश्नोत्तरातील माहिती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः देशातील १३१ शहरांतील हवा सर्वात जास्त प्रदूषित बनली आहे. त्यामधील सर्वात जास्त शहरे महाराष्ट्रात असून, त्यात कोल्हापूरचा समावेश असल्याची माहिती लोकसभेत सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी जाहीर करताना देण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातून महापालिकेला आठ कोटींचा निधी मिळाला आहे.
केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर ही माहिती दिली आहे. ही १३१ शहरे २४ राज्यांतील आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त प्रदूषित शहरे महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील तब्बल १९ शहरांमध्ये हवेतील प्रदूषणाची पातळी धोक्यावर गेली आहे. त्यासाठीच नेहमी हवेतील प्रदूषण तपासले जात आहे. एकेकाळी आल्हाददायक वातावरण म्हणून नावाजले जात असलेले कोल्हापूर आता त्या १९ प्रदूषित शहरांच्या यादीत गेले आहे. ही बाब शहरवासीयांबरोबर शहराचे नेतृत्व करणारे राजकारणी, प्रशासनातील अधिकाऱ्यांचे डोळे उघडणारी आहे.
कोल्हापूरबरोबरच शेजारील सांगलीचाही समावेश यादीत आहे. दक्षिण महाराष्ट्रातील ही दोन शहरे हवा प्रदूषणाच्या यादीत पोहचल्याने त्याची दुरुस्ती आतापासून गांभीर्याने केली नाही, तर भविष्यात परिस्थिती गंभीर होऊ शकते. धूळ कमी करणे, विविध माध्यमांतून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत. त्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर, नियमांची कडक अंमलबजावणी तसेच हिरवाई वाढवण्याचा कटाक्षाने प्रयत्न करावा लागणार आहे.
देशात प्रदूषित शहरे असलेल्या दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असून, तेथील १७ शहरे आहेत. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेशात १३ , पंजाबामध्ये ९, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि ओडिशात प्रत्येकी सात शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत. २०२५-२६ पर्यंत या सर्व शहरातील प्रदूषण ४० टक्क्यांपर्यंत घटविण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
महाराष्ट्रातील प्रदूषित शहरे
अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, ठाणे, वसई-विरार, उल्हासनगर