शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार गणवेश?

शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार गणवेश?

शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार गणवेश?
शिक्षण विभागाचे नियोजन; उन्हाळी सुट्टीपूर्वी विद्यार्थ्यांची मापे घेण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधला जातो. आजवरचा हाच शिरस्ता राहिला आहे. कधी-कधी त्यातही विलंब झाला आहे. मात्र, नवे शैक्षणिक वर्ष याला अपवाद ठरण्याची शक्यता आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी शिक्षण विभागाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. उन्हाळी सुट्टीपूर्वी विद्यार्थ्यांच्या गणवेशाची मापे घेण्याचे आदेश दिले आहेत.
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरवले जातात. पहिली ते आठवीच्या सर्व मुली, अनुसूचित जाती-जमाती व दारिद्ररेषेखालील मुलांना याचा लाभ मिळतो. एका विद्यार्थ्याला दोन गणवेश दिले जातात. त्यापोटी प्रत्येकी ३०० रुपयांप्रमाणे ६०० रुपये शाळांच्या बँक खात्यावर जमा केले जातात. शाळास्तरावर पात्र विद्यार्थ्यांचे एकत्रित गणवेश तयार करुन घेतले जातात. शाळा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होत असल्या तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यासाठी ऑगस्टचा दुसरा आठवडा उजाडतो. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात तर यापेक्षाही विलंब झाला आहे.
मात्र, नव्या शैक्षणिक वर्षात हे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून केले आहे. उन्हाळी सुट्टीपूर्वीच पात्र विद्यार्थ्यांच्या गणवेशाची मापे स्थानिक शिलाई कारागिराकडून घेण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प उपसंचालकांनी याबाबतचे पत्र दिले आहे. उन्हाळी सुट्टीपूर्वी गणवेशाची मापे घेण्याची कार्यवाही प्रथमच होते आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नवा गणवेश मिळण्याची शक्यता आहे.
-----------------------
‘त्या’ विद्यार्थ्यांचे काय...?
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने केलेले नियोजन चांगले आहे. मात्र, पहिलीत दाखल होणारे विद्यार्थी कोण व किती याचा अंदाज आताच लावणे शक्य नाही. तसेच पहिली ते सातवीच्या शाळा बदलणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश कसा देणार? हा प्रश्नदेखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com