प्रवेशद्वारावर ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवेशद्वारावर ठिय्या
प्रवेशद्वारावर ठिय्या

प्रवेशद्वारावर ठिय्या

sakal_logo
By

फोटो -
....

वीज कनेक्शनचा प्रश्‍न सोडवा, मगच गेट उघडतो...!

तिळवणी ग्रामस्थांनी ‘महावितरण’ची प्रवेशद्वारे अडवून केला निषेध

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ३ : ‘ओ सायेब, आम्हाला बी पोरंबाळ हाईत. घरात पाणी न्हाई. जगायचं कसं? पाण्याच्या टाकीसाठी वीज कनेक्शनचा प्रश्‍न सोडवा. मगच गेट उघडतो,’ तिळवणी (ता. हातकणंगले) गावातील महिलांनी चढ्या आवाजात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आज सुनावले. नळ पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन वीज कनेक्शन जोडणीचे काम झाले नसल्याने त्यांचा पारा चढला होता. ताराबाई पार्कातील महावितरणची सर्व प्रवेशद्वारे अडवून महिलांनी महावितरणचा निषेध केला.
गावात नळ पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असून, पंचगंगा नदीवरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जॅकवेलमध्ये मोटर पंप बसविण्यात आले आहेत. एक लाख लिटरची पाण्याची टाकी व फिल्टर प्लँटकरिता ग्रामपंचायतीकडून नवीन वीज कनेक्शनची मागणी दीड वर्षांपासून केली जात आहे. महावितरण २ कोटी ५२ लाख ५१ हजार ८५० रुपये थकबाकीचे कारण सांगून कनेक्शन देता येत नसल्याचे सांगत आहे. ही थकबाकी एकूण चौदा गावांची आहे. या स्थितीत तिळवणी गावात तीन वर्षांपासून पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महावितरणने वीज कनेक्शन त्वरित द्यावे, या मागणीसाठी तिळवणी ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश पाटील, उपसरपंच दीपक गायकवाड यांच्यासह निवासी कोळी, मनोज चौगुले, योगेश कुंभार, नीलेश गायकवाड, जीवन कानिटकर, शक्ती कांबळे, अभिजित चव्हाण, स्वप्नील माने, राहुल कुरणे, आकाश माने, नवनाथ कांबळे, जीवन चव्हाण जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. उपोषणाचा आज तिसरा दिवस होता.
हा प्रश्‍न मार्गी लागावा, यासाठी गावातील शिष्टमंडळ दुपारी महावितरणच्या कार्यालयात आले. तेथील अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनी चर्चा केली. ही चर्चा निष्फळ ठरल्याने महिला व ग्रामस्थांनी दुपारी चार वाजता महावितरणच्या सर्व प्रवेशद्वारे अडवली. तेथे ठिय्या मारून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘महावितरणचे करायचे काय खाली डोके वर पाय,’ ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा,’ ‘महावितरण हाय हाय,’ ‘महावितरणचा धिक्कार असो,’ अशा घोषणा दिल्या. सायंकाळी सहा वाजल्यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पंचायत झाली. महिलांनी प्रवेशद्वारावर ठिय्या मारल्याने त्यांना बाहेर येणे मुश्‍कील झाले.
--------------

उपोषणकर्त्याची प्रकृती स्थिर

बेमुदत उपोषणास बसलेले जीवन कानिटकर यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये आज दाखल केले होते. त्यांची प्रकृती ढासळल्याने ग्रामस्थांनी त्यांना इचलकरंजीतील खासगी रुग्णालयात हलविले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ग्रामस्थ शीतल पाटील यांनी दिली.