
आमदार प्रकाश आबिटकर लक्षवेधी
सहकारी पतसंस्थांसाठी तज्ज्ञ समिती
आमदार प्रकाश आबिटकर ः विधानसभेत लक्षवेधी सूचनेनंतर घोषणा
कोल्हापूर, ता. ३ ः राज्यातील पतसंस्थांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच तज्ज्ञांची समिती गठीत केली जाणार आहे. याबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर सहकारमंत्री अतुल सावे यांनी याबाबतची घोषणा केल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
राज्यात खासगी सावकारी, तसेच मायक्रो फायनान्सच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक लूट होत आहे. ती थांबविण्यासाठी पतसंस्थांची चळवळ सक्षम करणे आवश्यक असल्याचे आमदार आबिटकर यांनी सांगितले. शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता ९० हजार कोटी रुपयांच्या ठेवी पतसंस्थांकडे असून शासनाच्या नियमानुसार या सर्व संस्था कार्यरत आहेत. सध्या ९० हजार कोटीवरून २५ लाख कोटी रुपयांपर्यंत ठेवींची संख्या वाढेल, एवढी क्षमता या चळवळीमध्ये आहे. त्यामुळे ‘ब’ वर्ग संस्थांना ठेवी व कर्ज घेण्यासाठी परवानगी देणे, ठेवींना विमा संरक्षण देणे गरजेचे असल्याचेही आमदार आबिटकर यांनी सांगितले.
सद्यस्थितीत राज्यात तेरा हजार ४१२ नागरी व ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आणि सहा हजार ५३६ कर्मचारी सहकारी पतसंस्था अशा एकूण १९ हजार ९४८ सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत. या पतसंस्थांमध्ये तीन कोटींहून अधिक ठेवीदारांच्या ९० हजार ५०१ कोटी इतक्या रकमेच्या ठेवी आहेत. त्यामुळे पंधरा दिवसांत तज्ज्ञ समिती गठीत केली जाईल, असे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.