
आमदार ऋतूराज पाटील
निराधार योजना अनुदान
तीन हजारांपेक्षा जास्त करावे
---
आमदार ऋतुराज पाटील; विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे मागणी
कोल्हापूर, ता. ३ ः संजय गांधी निराधार, श्रावणबाळ तसेच अन्य योजनांतील लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम तीन हजार रुपयांपेक्षा जास्त करावी, दिव्यांग व्यक्तींप्रमाणेच बाकीच्या लाभार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा २१ हजारवरून ५० हजार करावी, निराधार लाभार्थ्यांच्या मुलांच्या वयाची अट काढून टाकावी, तसेच शासन निर्णयाप्रमाणे सर्व योजनांचे अर्ज तलाठी कार्यालयात स्वीकारण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशा मागण्या आमदार ऋतुराज पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केल्या.
योजनांची अंमलबजावणी करताना त्यातील अटी जाचक ठरत आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत लाभार्थ्यांची मुले २५ वर्षांची झाली की लाभार्थ्यांचे अनुदान बंद होते. वाढत्या बेरोजगारीबरोबरच बऱ्याच ठिकाणी ही मुले आई-वडिलांना सांभाळत नाहीत, असे चित्र आहे. त्यामुळे ही अट काढावी. योजनांतील अर्जदारांच्या सोयीसाठी २० ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार संबंधित अर्जदाराने आपला अर्ज तो राहत असलेल्या भागातील तलाठ्याकडे जमा करावा. तलाठ्यांनी प्राप्त अर्जांची व त्याबरोबरच्या कागदपत्रांची छाननी करून तो अर्ज नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांच्याकडे पाठवावेत, असे नमूद केले आहे. मात्र, अर्जदार तलाठ्यांकडे अर्ज द्यायला गेले तर त्यांना तहसील कार्यालयात अर्ज जमा करण्यासाठी सांगितले जाते, असे आमदार श्री. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, सर्व मागण्यांबाबत विभागाने सकारात्मक विचार केलेला आहे. लवकरात लवकर या सर्व विषयांबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर केला जाईल. निराधार आणि गरिबांना आधार देण्याचे काम राज्य शासन करेल, असे मंत्री संजय राठोड यांनी या वेळी सांगितले.