
परभाषेतील शिक्षण मालिका
मालिका लोगो कालच्या टुडे १ वरून घेणे- परभाषेतील शिक्षण ः भाग ४
--
मातृभाषेतील शाळांची शेवटची घटिका
मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा पट घटला; भाषा संवर्धनाच्या दृष्टीने धोक्याची घंटा
ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. परिणामी मराठी माध्यमातील शाळा आता शेवटच्या घटका मोजत आहेत. भाषा संवर्धनाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल.
दोन दशकांपूर्वी शहरातील काही नावाजलेल्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पालकांना धावपळ करावी लागायची. प्रतिष्ठित लोकांची पत्र घेऊन पालक रांगेत उभारायचे. याच शाळा सध्या विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. आता त्यांना आपला पट पूर्ण व्हावा यासाठी धावपळ करावी लागते. कारण इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मुलांना घालण्याचे प्रमाण वाढले आहे. इंग्रजी किंवा मराठी दोन्ही माध्यमातून चांगले शिक्षण मिळते. पण, मातृभाषेत शिक्षण न घेतल्यास भाषेपासून दुरावण्याची शक्यता जास्त असते. ही परिस्थिती सध्या पाहायला मिळते. गुजराती सिंधी भाषांच्या शाळा बंद झाल्या. आता या समाजातील विद्यार्थ्यांना त्यांची मातृभाषा योग्य पद्धतीने अवगत नाही. अशी स्थिती मराठीबाबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अकरावी-बारावी विज्ञान कॉमर्स व अन्य शाखांचा अभ्यासक्रम ही इंग्रजी माध्यमातून आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणही इंग्रजी भाषेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच इंग्रजीची सवय व्हावी या उद्देशाने पालक त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. काळाची पावले ओळखून काही मराठी माध्यमांच्या शाळांनी सेमी इंग्लिश अभ्यासक्रम सुरू केले आहेत. मात्र, तरीही अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा ओघ कमी होताना दिसत आहे.
मातृभाषेत शिक्षण देणे बंद झाले तर त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतील. काळाच्या ओघात मातृभाषेचा व्यवहारातील उपयोगही कमी होईल. यासाठीच मातृभाषेतील शिक्षण देणाऱ्या शाळा टिकल्या आणि वाढल्या पाहिजेत असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. (समाप्त)
कोट
मातृभाषेत शिकल्याने विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन चांगले होते. मातृभाषेतील शिक्षणाचा आग्रह धरतानाच संशोधनही मातृभाषेत होणे आवश्यक आहे. जपान, दक्षिण कोरिया, चीन या देशांमध्ये हे पाहायला मिळते.
- डॉ. व्ही. एन. शिंदे, प्रभारी कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ