आजरा ः दोनशे एकराचा परिसर जळाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः दोनशे एकराचा परिसर जळाला
आजरा ः दोनशे एकराचा परिसर जळाला

आजरा ः दोनशे एकराचा परिसर जळाला

sakal_logo
By

86726

मडिलगे (ता. आजरा) ः ब्लोअर मशिनच्या सहाय्याने जंगलातील वणवा विझवताना कर्मचारी.

-----------------
वझरे पठार, मडिलगे जंगलाला वणवा

दोनशे एकर परिसर खाक ः दोन दिवस आगीचे तांडव

सकाळ वृत्तसेवा

आजरा, ता. ३ ः वझरे पठार व मडिलगे जंगलाला लागलेल्या वणव्यात सुमारे दोनशे एकरांहून अधिक परिसर जळून खाक झाला. दोन दिवस आगीचे तांडव सुरू होते. वणव्यात दुर्मिळ औषधी वनस्पती, विविध प्रकारची झाडे जळून खाक झाली आहेत. वणव्याचे नेमके कारण समजले नाही; पण ही आग कोणीतरी लावली असण्याची शक्यता वन विभागातून व्यक्त करण्यात आली आहे.
आजरा तालुक्यात वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसाआड एक तरी वणवा लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. या आठ दिवसांत कोरिवडे, हरपवडे, देवकांडगाव, रामतीर्थ, चितळे परिसरांत वणवे लागले. त्यापूर्वी आजऱ्यातील वनौषधी पार्क जळाले आहे. वणव्यामुळे जंगलातील वनस्पती, झाडे होरपळून गेली. त्याचबरोबर सरीसृप प्राण्यांना हानी पोहचली आहे. पक्षी, वन्यप्राण्यांचे अधिवास नष्ट झाले आहेत. काल गुरुवारी (ता. २) येथील वझरे पठाराला वणवा लागला. रात्रभर पठार जळत होते. वाळलेले गवत व पालापाचोळा यामुळे आग पसरत गेली. त्यामुळे सुमारे दोनशे एकरांचा जंगल परिसर जळून गेला आहे. आज सकाळपर्यंत आगीची धग कायम होती. आज पुन्हा येथे आग भडकली. वन विभागाचे कर्मचारी प्रवीण कांबळे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवली. दुपारी तीननंतर मडिलगे परिसरातील जंगलाला वणवा लागला. वन विभागाचे कर्मचारी मारुती शिंदे, दयानंद शिंदे, मधुकर दोरुगडे यांनी ब्लोअर मशिनच्या सहाय्याने आग विझवली.

...

* वणव्यांचा काजू बागांना फटका

जंगलातून येणाऱ्या वणव्यांचा काजू बागांना फटका बसत आहे. वणव्यात जंगलालगतच्या काजू बागा जळून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. देवकांडगाव येथे काजू बागांचे मोठे नुकसान झाले असून कोळींद्रे येथे अरुण भोगले यांची काजू बाग जळाली आहे.