जुनी पेन्शन मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुनी पेन्शन मोर्चा
जुनी पेन्शन मोर्चा

जुनी पेन्शन मोर्चा

sakal_logo
By

86855
86853
...

एकच मिशन जुनी पेन्शन

मोर्चात पंचवीस हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ४ : जुन्या पेन्शनचा वाद नका वाढवू नाहीतर तुम्हाला सत्तेतून घालवू, असा रोखठोक इशारा देत काढण्यात आलेल्या मोर्चाने शहरवासीयांचे आज लक्ष वेधले.
राज्य सरकारी, निमसरकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महापालिका कर्मचारी, समन्वय समिती व जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आमदार सतेज पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्त्व केले. शिक्षकांच्या पस्तीस, तर मध्यवर्ती पन्नास अशा एकूण नव्वद संघटनांतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. सुमारे पंचवीस हजारांहून अधिक कर्मचारी मोर्चात सहभागी झाले.
गांधी मैदान येथून सकाळी अकरा वाजता मोर्चास सुरवात होणार होती. जिल्ह्यातील बारा तालुक्यांतील शिक्षक-शिक्षकेतर, सरकारी-निमसरकारी, महापालिका कर्मचारी सकाळी नऊपासून मैदानाकडे येत होते. ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ असा मजकूर असलेल्या गांधी टोप्या शिक्षकांच्या डोक्यावर होत्या. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आपापल्या संघटनांचे फलक घेऊन कर्मचारी आले होते. सकाळी साडे अकराच्या सुमारास मैदानातून मोर्चास सुरवात झाली आणि मैदान घोषणांनी दणाणून गेले.
कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, ज्यांना आम्ही गादीवर बसवलंय त्यांनीच आम्हाला रस्त्यावर आणलंय, कोई तो निकालो इसका हल, बिना पेन्शन के कैसे बितेगा कल, नका करू जुन्या पेन्शनची बेरीज, नाहीतर आणू सत्ताधाऱ्यांना जेरीस, आमचं ठरलंय आता आम्ही नाही मागे हटणार, जुनी पेन्शन घेऊनच शांत बसणार, जुनी पेन्शन आमचा हक्क आहे, असे फलक कर्मचाऱ्यांच्या हातात होते. खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, सीपीआर, दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, असेंब्ली रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग राहीला. गावा-गावांतून आलेले कर्मचारी मोर्चाच्या मार्गात थांबले होते. मोर्चा आल्यानंतर ते त्यात सहभागी होत होते. खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, सीपीआर, दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, असेंब्ली रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग राहिला. कार्यालयाच्या परिसरात येताच कर्मचाऱ्यांच्या घोषणांचा जोर वाढला. येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
मोर्चात मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश संकपाळ, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे एस. डी. लाड, माजी प्राचार्य आर. डी. पाटील, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरूटे, प्रसाद पाटील, डी. एस. घुगरे, आदिल फरास, खंडेराव जगदाळे, दत्ता पाटील, गौतम वर्धन, अर्जुन पाटील, प्रमोद तौंदकर सहभागी झाले होते.
---------------

कोण म्हणतंय देत नाही ...

कर्मचारी अनिरूद्ध शिंदे याने व्यासपीठावर येऊन घोषणाबाजी सुरू केली. आमच्या हक्काची, सोडायची नाही, भांडून घेऊ, कोण म्हणतंय देत नाही, अशा घोषणा तो देत असताना अन्य कर्मचारी टाळ्यांच्या गजरात ‘जुनी पेन्शन,’ असा नारा देत होते. त्यामुळे वातावरणात उत्साह निर्माण झाला.
---------------

ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

मोर्चात सुमारे पंचवीस हजार कर्मचारी सहभागी झाले होते. इतक्या मोठ्या संख्येने कर्मचारी आल्याने त्यांनी मैदानाच्या परिसरात वाहने पार्किंग केली होती. मोर्चा सुरू झाल्यानंतर ठिकठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. वाहतूक शाखेचे कर्मचारी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात व्यस्त होते.
---------------

पर्यायी मार्गांचा आधार

गावागावांतून आलेले कर्मचारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात येऊन थांबले होते. येथे सभेसाठी व्यासपीठ उभारले होते. हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता. परिणामी पर्यांयी मार्गाचा वाहन चालकांना आधार घ्यावा लागला.