शाहू कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्र
शाहू कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्र

शाहू कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्र

sakal_logo
By

फोटो : 86911
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमधील चर्चासत्रात बोलताना डॉ. व्ही. एम. पाटील.
...

चळवळी जिवंत समाजाचे लक्षण

प्राचार्य व्ही. एम. पाटील : राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्र

कोल्हापूर, ता. ४ : ‘चळवळी या जिवंत समाजाचे लक्षण आहेत. शासनावर दबाव आणण्यासाठी तसेच आपले सामाजिक प्रश्न सोडविण्याकरीता चळवळी महत्त्वाच्या आहेत. सामाजिक आणि राजकीय चळवळींच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचविता येईल,’ असे प्रतिपादन न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमधील इतिहास विभाग आणि भारतीय सामाजिक विज्ञान व अनुसंधान परिषदेतर्फे (आयसीएसएसआर) आज एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र झाले. डॉ. पाटील यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्‌घाटन झाले.

शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल. डी. कदम म्हणाले, ‘२० व्या शतकात समाजाच्या सर्वच क्षेत्रात बदल झाले. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे चळवळ होय. अनेक राजकीय आणि सामाजिक चळवळींचा उदय कोल्हापूरमधून झाला. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी सर्वसामान्य लोकांसाठी अनेक चळवळी उभ्या केल्या.’

ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य आनंद मेणसे यांनी २० व्या शतकातील सामाजिक आणि राजकीय चळवळींचा आढावा घेतला. शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भणगे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात शिवाजी विद्यापीठातील इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनिश पाटील यांनी ‘स्वातंत्र्य चळवळीत काही दुर्लक्षित पैलू’ यावर मार्गदर्शन केले; तर सत्राध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. अरुण भोसले यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रामध्ये खुले शोधनिबंध वाचन झाले. या सत्रासाठी वाळवा (जि. सांगली) येथील क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयचे इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. भारतभूषण माळी आणि सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेमधील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिवाजीराव पाटील यांनी सत्राध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले.

समारोप समारंभासाठी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. सिंधू आवळे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. कदम अध्यक्षपदी होते. या चर्चासत्रासाठी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज (माई) पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. समन्वयक प्रा. डॉ. सुप्रिया खोले यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती एस. डी. मुरकर आणि श्रीमती एस. आर. माजगावकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. करीम मुल्ला, प्रा. विनोद आखाडे, प्रा. निलेश वळकुंजे, प्रा. अंकुश घुले, डॉ. महेश रणदिवे आदी प्राध्यापकांनी सहसमन्वयक म्हणून काम पाहिले.