
सराफाला ९ लाखांचा गंडा
साडेनऊ तोळे सोने,
लाख रुपयांसह पोबारा
कारागिराचा सराफ व्यावसायिकला गंडा
कोल्हापूर, ता. ४ ः दागिने कलाकुसरीसाठी येथील सराफाकडून घेतलेले साडेनऊ तोळे २४ कॅरेट सोने आणि मजुरीसाठी घेतलेले एक लाख रुपयांसह पश्चिम बंगालचा एक कारागीर पसार झाला आहे. जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले, की याप्रकरणी हसीबुल इस्त्राईल शेख (रा. पूर्व दुर्गापूर, पश्चिम बंगाल) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. येथील सराफ मनोग्यकुमार उत्तमचंद पगारिया यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः पगारिया यांची सराफ पेढी गुजरीतील जोतिबा रोडवर आहे. ते बंगाली कारागिरांकडूनच दागिन्यांची कलाकुसर करून घेत होते. शेख त्यांच्याकडील नेहमीचाच कारागीर होता. पगारिया यांनी शेखला १२ डिसेंबर २०२२ ला साडेनऊ तोळे सोने दिले, तर मजुरीचे एक लाख आठ रुपये त्याच्या बँक खात्यावर पाठवले. ठरलेल्या मुदतीत शेखने दागिने दिले नाहीत. दागिन्यांवर कलाकुसर झालेली आहे की नाही, याचीही माहिती वारंवार विचारणा करूनही मिळत नव्हती. शेखकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पगारिया यांनी शुक्रवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार पोलिसांनी कारागीर शेख यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी दिली. कारागीर अलीकडे नेमका कोठे राहतो, त्याच्या संपर्कात कोणकोण आहेत, याचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. याबाबत फिर्यादी सराफ यांच्याकडूनही माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
-