
तरुणाचा बुडून मृत्यू
फोटो
...
पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा
पतौडी खाणीत बुडून मृत्यू
कोल्हापूर, ता. ४ - ऊन्हाच्या तडाख्याने बेजार झाल्याने मित्रांसह पतौडी खणीत पोहण्यासाठी गेलेल्या साळोखे पार्क येथील तरुणाचा आज बुडून मृत्यू झाला. सुजित विलास गायकवाड (वय १९, भारतनगर, साळोखे पार्क) असे त्याचे नाव आहे. आज दुपारी पोहायला गेल्यानंतर त्याला दम लागून तो पाण्यात बुडाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. त्याच्या मागे आई, दोन भाऊ असा परिवार आहे.
पोलिसांकडून आणि नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी, सुजित हा गवंडी काम करतो. आज त्याने सुटी घेतली होती. दुपारी चार मित्रांसोबत तो रंकाळा परिसरातील पतौडी खाणीत पोहण्यास उतरला. तो पट्टीचा पोहणार होता. मात्र त्याला दम लागल्यामुळे तो बुडू लागला. यावेळी त्यांच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मित्रांनाही ओढू लागला. तरीही मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. ते प्रयत्न असफल होत असल्याचे दिसताच मित्रांनी त्याला तातडीने शेजाऱ्याकडील इनर घेवून त्याच्याकडे फेकली. मात्र इनर घेण्याचे त्याचे प्रयत्न अपुरे पडल्यामुळे मित्रांच्या समोरच तो पाण्यात बुडाला. तातडीने अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. बोटीने त्याचा शोध घेतला आणि त्याचा मृतदेह बाहेर काढला. सायंकाळी सातच्या सुमारास त्याचा मृतदेह घरी नेण्यात आला.
दरम्यान सुजितच्या मृत्यूनंतर त्याचा छायाचित्रासह ‘मिस यू सुजीत भाऊ...’ ‘वाघ हरपला...’ अशा पद्धतीचे ‘स्टेट्स’ भागातील नागरिक आणि मित्रमंडळीनी मोबाईलवर ठेवले होते. सोशल मीडियावरसुद्धा त्याच्या बद्दल हळहळ व्यक्त होत होती.