
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
87001
गडहिंग्लज : गडहिंग्लज हायस्कूलच्या वस्तीगृहात सोलर बसविण्यात आला. याप्रसंगी पंडित पाटील, तुकाराम भोसले, सुनील कांबळे आदी.
गडहिंग्लज हायस्कूलच्या वसतीगृहासाठी सोलर
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूलच्या वसतिगृहासाठी माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून सोलर बसविण्यात आला. डॅनफॉस पॉवर सोल्युशन्स इंडिया या कंपनीने सीएसआर फंडातून हा ५०० लिटर क्षमतेचा सोलर बसवून दिला आहे. माजी विद्यार्थी प्रेमा कुरबेट्टी, महेश कुरबेट्टी, माजी सैनिक कुमार पाटील, हेमलता पाटील यांचे सहकार्य मिळाले. प्राचार्य पंडित पाटील, वस्तीगृहाचे अधीक्षक तुकाराम भोसले, पर्यवेक्षक सुनील कांबळे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
-----------------
नंदिनी बहुरुपीचे चित्रकलेत यश
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूलची विद्यार्थिनी नंदिनी बहुरुपी हिने चित्रकला स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला. साई सर्व्हिसतर्फे ही स्पर्धा घेतली होती. तिला कला शिक्षक राजेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शन मिळले. शिक्षण विस्तार अधिकारी आर. आर. कोरवी, प्राचार्य पंडित पाटील, पर्यवेक्षक सुनील कांबळे, साईचे व्यवस्थापक सतीश कुंभार, प्रवीण कोळेकर, अजित इनामदार, प्रवीण पाटील यांच्या उपस्थितीत नंदिनीचा गौरव करण्यात आला.
------------------
‘युनिव्हर्सल’तर्फे महिलांसाठी स्पर्धा
गडहिंग्लज : येथील युनिव्हर्सल फ्रेंडस् सर्कलतर्फे महिलांसाठी चालण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. मंगळवारी (ता.७) सकाळी आठला नेहरु चौकातून स्पर्धेला सुरुवात होईल. जागतिक महिला दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ४० वर्षांवरील महिला या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच किलो, तीन किलो, दोन किलो चहा पावडर दिली जाणार आहे. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व पौष्टिक ज्युस दिला जाणार आहे. इच्छुकांनी सीमा आजरी व लक्ष्मी मडलगी यांच्याकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------------
रेडेकर रुग्णालयातर्फे आरोग्य तपासणी शिबिर
गडहिंग्लज : येथील केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयातर्फे सोमवारपासून (ता. ६) मोफत आरोग्य तपासणी व अल्पदरात शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. १० मार्चपर्यंत हे शिबिर चालणार आहे. कै. केदारी रेडेकर यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त हे शिबिर होणार आहे. या शिबिरात हर्निया, हायड्रोसिल, मूलव्याध, सुंता करणे, नैसर्गिक व सिझर प्रसूती, अपेंडिक्स, भगंदर, टॉन्सिल्स आदी शस्त्रक्रिया अल्पदरात केल्या जाणार आहेत. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत प्रोस्टेट ग्रंथी, मुतखडा, थायरॉईड, कानाचा पडदा, नाकातील हाड वाढणे, स्तन व गर्भाशयाचा कर्करोग, आंतड्याचे आजार, तोंड व जिभेच्या कर्करोग, मूत्राशय कर्करोगावर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. मधुमेह, रक्तदाब, दमा, मणक्याचे विकार, स्त्रियांचे व लहान मुलांच्या आजारांची तपासणी केली जाणार आहे. ईसीजी, एक्सरे, रक्ताच्या तपासणीत २५ टक्के सवलत दिली जाणार आहे. या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्षा अंजना रेडेकर यांनी केले आहे.