बाल विभाग

बाल विभाग

87120, 87121

चार वर्षांत नूतनीकरणाला अवकळा
सावित्रीबाई फुले रुग्णालयातील बाल विभागाची अवस्था; फरशा उचकटल्या

कोल्हापूर, ता. ५ ः बहुतांश रूममधील फरशा भेगा पडून उचकटल्या आहेत. अनेक ठिकाणी भिंतीवर लावलेल्याही फरशा निखळून पडत आहेत. पाणी नसल्याने स्वच्छतागृह बंद, अशी दयनीय अवस्था महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील बाल विभागाची झाली आहे. चार वर्षांपूर्वी या विभागाचे नूतनीकरण झाले होते. पण, तिथे नूतनीकरण झाले होते का अशी विचारण्याची वेळ आता आली आहे. दुरुस्ती केली नसल्याने रुग्ण, नातेवाईक अनवाणी चालल्यास गंभीर दुखापती होण्याची चिन्हे आहेत.
रुग्णालयाच्या प्रसूती विभागाच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर बाल विभाग आहे. तिथे लहान बाळांसाठी आयसीयूचे नियोजन केले आहे. त्यासाठीची पाच मशिन कार्यरत आहेत. पूर्ण वाढ न झालेल्या बाळांसाठी एक स्वतंत्र वॉर्डही केला जाणार आहे. त्यासाठी रोटरीसारख्या संस्थांनी मदत करण्याची तयारी दर्शवली होती. त्याकरिता चार वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या विभागाचे नूतनीकरण करून घेतले. फरशा बसवण्याबरोबरच ठिकठिकाणी खराब झालेला स्लॅब, गिलावा दुरुस्त केला. विजेची व्यवस्था केली होती. मात्र त्यातील फरशांचे काम फारच तकलादू केल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षीपासून काही फरशा अचानक तुटू लागल्या. एका वॉर्डमधील फरशा तर उचकटून वर आल्या आहेत. काहींचे तुकडे पडले आहेत. कर्मचाऱ्यांनाही त्याचे कारण समजलेले नाही. पूर्ण वाढ न झालेल्या बाळांसाठीचा विभाग सोडल्यास शेजारील इतर वॉर्डमध्ये मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. लहान मुलांना ॲडमिट केल्यास त्यांच्याबरोबर पालकही असतात. तुटलेल्या फरशांवरून चालताना पायाला लागू नये म्हणून कर्मचाऱ्यांनी त्या फरशीवर बेड ठेवले आहेत. पण, काही विभागात पूर्ण भागातील फरशा उचकटलेल्या आहेत. त्यामुळे एक वॉर्ड बंद करूनच ठेवला आहे. फार आवश्‍यकता वाटली तरच तिथे रुग्णांना ठेवले जात आहे. प्रसूतिगृहाप्रमाणेच या मजल्यावरही २५ बेडचा हॉल आहे. त्यातही फरशांना भेगा पडल्‍या आहेत. प्रसूती विभागात रुग्ण संख्या जास्त झाली तर या मजल्यावर ठेवले जाते. पण, फरशांपासून काळजी घेण्यास सांगितले जाते.

चौकट
स्वच्छतागृह बंदच
पहिल्या मजल्यावरील रुग्णांसाठी स्वच्छतागृह आहे. पण, तिथे पाणी नाही. काहींच्या खिडक्या तुटल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना तळमजल्यावरील स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत आहे. मजल्यावर नियमित स्वच्छता करण्यासाठीही पाणी नाही. त्यामुळे अग्निशमन व्यवस्थेसाठी सोडलेल्या पाईपमधील पाण्याचा वापर केला जात आहे.

कोट
तुटलेल्या फरशा दुरुस्तीसाठी तातडीने कनिष्ठ अभियंत्यांना सांगितले जाईल. इतर सुविधा लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू केल्या जातील.
-रविकांत आडसूळ, उपायुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com