
मुश्रीफ बातमी
‘बसवेश्वर महाराज आर्थिक
विकास महामंडळाची स्थापना करा’
कोल्हापूर,ता. ५ ः लिंगायत समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार, उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करा, अशी आग्रही मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या आर्थिक विकास महामंडळाकडून बिनव्याजी कर्जपुरवठा व्हावा व अनुदान मिळावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आमदार श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या मागणीचा विचार होऊन अर्थसंकल्पामध्ये तशी घोषणा व तरतूद व्हावी, अशी मागणी करणारे पत्र आमदार श्री. मुश्रीफ यांनी दिले.
विविध समाजातील बेरोजगार युवक- युवतींच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी विविध आर्थिक विकास महामंडळे कार्यरत आहेत. मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. इतर मागासवर्गीयांसाठी ओबीसी आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. मातंग समाजासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. मागासवर्गीय समाजासाठी महात्मा ज्योतिबा फुले आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. भटक्या व विमुक्त जाती जमातींसाठी वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. याच धर्तीवर हे महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी श्री. मुश्रीफ यांनी केली आहे.