लोकसभा चाहूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकसभा चाहूल
लोकसभा चाहूल

लोकसभा चाहूल

sakal_logo
By

नेत्यांच्या दौऱ्याने लोकसभेची चाहूल

वर्षभर अगोदरच तापले वातावरण ः सर्वच पक्षांचे उमेदवार मात्र गुलदस्त्यात

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ५ ः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून ते अन्य राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेत्यांच्या कोल्‍हापूर दौऱ्याने लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्षाचा अवधी आहे. प्रत्यक्ष रिंगणात कोण उमेदवार असणार, हे गुलदस्त्यात असले तरी सभा, मेळावे आणि विविध विकासकामांच्या उद्घाटनाने राजकीय वातावरण मात्र तापले आहे.
गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी, हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, माजी खासदार किरिट सोमय्या, आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील तर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे दौरे झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या व्यतिरिक्त काँग्रेस, राष्ट्रवादीचे राज्य पातळीवरील नेते कोल्हापुरात आलेले नाहीत.
दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना यांची आघाडीच श्री. शहा यांनी जाहीर केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडीक व अपक्ष म्हणून निवडून आलेले पण भाजपसोबत असलेले आमदार डॉ. विनय कोरे, प्रकाश आवाडे एवढीच ताकद आहे. गेल्या निवडणुकीत ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडून विजयी झालेले खासदार प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने व आमदार प्रकाश आबिटकर यांनी श्री. शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. याशिवाय अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे पहिल्यापासून तर शिवसेना व धनुष्यबाणाचा निर्णय झाल्यानंतर माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी श्री. शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपने या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. श्री. शहा यांच्या उपस्थितीत झालेला मेळावा, श्री. गडकरी यांच्या हस्ते झालेली बास्केटब्रिजची पायाभरणी, केंद्रीय मंत्री शिंदे यांनी विविध तालुक्यात जाऊन केंद्राच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी साधलेला संवाद हा त्याचाच एक भाग आहे.
............

उमेदवार कोण ?

भाजप- सेना (शिंदे) युतीत या दोन जागा कोणाला हा महत्वाचा प्रश्‍न असेल. गेल्यावेळी शिवसेनेने या दोन्ही जागा जिंकल्या आहेत. आता भाजपकडेच नव्हे तर दोन्ही शिवसेनेकडे तयारी केलेल्या उमेदवारांची वानवा आहे. त्यामुळे विद्यमान खासदार प्रा. मडंलिक व श्री. माने हेच दोन पर्याय भाजपसमोर आहेत. एक तर या दोघांना भाजपची उमेदवारी दिली जाईल किंवा शिवसेनेसाठी या जागा सोडून भाजप त्यांना पाठिंबा देईल. कोल्हापूरचा इतिहास बघता लोकांना गृहीत धरून घेतलेला निर्णय मतदारांच्या पचनी पडत नाही. दिवंगत दिलीप देसाई यांच्या पत्नीचा पराभव, दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचा झालेला विजय ही त्याची उदाहरणे आहेत. आताही हीच खदखद सोशल मिडीयाच्या माध्यमातून कमी-अधिक प्रमाणात पहायला मिळते. अशा परिस्थितीत विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली जाईल का ? हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे.
.............

आघाडीतही उमेदवार नाहीच

महाविकास आघाडी म्हणून शिवसेना (ठाकरे गट) व दोन्ही काँग्रेस एकत्र आले तर या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जातील. पण त्यांच्याकडे उमेदवारच नाही अशी स्थिती आहे. ठाकरे गट वगळून दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यास या दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहेत. पण त्यांच्याकडेही उमेदवार नाहीच. डॉ. चेतन नरके यांनी जरी महाविकास’ कडे उमेदवारीची मागणी केली असली तरी त्यांच्यासमोर उमेदवारी मिळवणे हेच आव्हान असेल. हातकणंगलेत तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच प्रबळ उमेदवार दिसतात. पण ते रिंगणात उतरतील का ? हा प्रश्‍न आहे. त्यामुळे या मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याशिवाय ‘महाविकास’ समोर पर्याय नाही. पण यापूर्वीचा अनुभव पाहता श्री. शेट्टीच यासाठी तयार होतील का? हा प्रश्न आहे.