
लायन्स ब्लड बँकेचे आधुनिकीकरण
लायन्स ब्लड बँकेचे आधुनिकीकरण
एक कोटींचा निधी खर्च; नव्या यंत्रसामुग्रीसह रुग्णवाहिका सेवेत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : गेली दोन दशके कार्यरत असलेल्या अण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँकेचे आधुनिकीकरण केले आहे. रक्तसंकलन, तपासणी व साठवणुकीसाठी नवी यंत्रसामुग्री उपलब्ध केली आहे. नवी रुग्णवाहिकाही सेवेत राहणार आहे. यासाठी लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेसह स्थानिक संस्था व स्वनिधीतून एक कोटी रुपये खर्च केले आहेत. आधुनिकीकरणामुळे ब्लड बँकेचे कामकाज अधिक चांगल्या प्रकारे चालल्याची माहिती लायन्स ब्लड बँकेचे अध्यक्ष आण्णासाहेब गळतगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. गळगते म्हणाले, ‘गडहिंग्लजसह शेजारच्या तालुक्यातील रुग्णांची गरज लक्षात घेऊन २००१ मध्ये लायन्स क्लबच्या माध्यमातून ब्लड बँक सुरु केली. तीन वर्षांनंतर रक्त घटक वेगळे करण्यास प्रारंभ झाला. ग्रामीण भागात रक्तदान शिबीर घेणे सोयीचे व्हावे यासाठी सहा वर्षांपूर्वी वातानुकुलीत ब्लड डोनेशन व्हॅनची सोय केली आहे. लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेने ६९ लाखांचा निधी दिला. स्थानिक संस्था, व्यक्ती व स्वनिधीतून ३१ लाख रुपये उभारले.’ यावेळी सचिव सुनील पट्टणशेट्टी, डॉ. सुभाष पाटील, आर. जी. पाटील, व्यवस्थापक राजेंद्र कुंभार आदी उपस्थित होते.
--------------------
लवकरच रक्त साठवणूक केंद्र
गडहिंग्लजच्या ग्रामीण भागासह आजरा व चंदगड तालुक्यातील रुग्णालयांकडून रक्ताची मागणी केली जाते. अशा वेळी रुग्णाच्या नातेवाईकांना गडहिंग्लजला यावे लागते. यात वेळ वाया जातो. हे टाळण्यासाठी पहिल्या टप्प्यात महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन हॉस्पिटलमध्ये रक्त साठवणूक केंद्र सुरु केले जाणार आहे. त्यानंतर आजरा येथे केंद्र सुरु करण्याचा मानस श्री. गळतगे यांनी व्यक्त केला.