
गुन्हेगारी वृत्त
उसनवारीतून तरुणाला मारहाण
कोल्हापूर : उसने पैसे परत देण्याच्या कारणातून बालिंगा येथे तरुणाला मारहाण करण्यात आली. याबाबतची फिर्याद योगेश भाऊसो सूर्यवंशी (वय ३४, रा. फुलेवाडी) यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. संग्राम वरेकर, सुनील वरेकर, सागर वरेकर (सर्व रा. फुलेवाडी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश यांनी सुनील वरेकर यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता. या व्यवहाराच्या वादातून सुनील आणि सागर यांनी बालिंगा येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. या वेळी तिघांनी योगेश यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यात काचेची सोड्याची बाटली फोडली. याबाबतचा गुन्हा करवीर पोलिस ठाण्यात दाखल केरण्यात आला आहे.
----------
विविध ठिकाणी झालेल्या चोऱ्यांत
दुचाकीसह सायकल, मोबाईलची चोरी
कोल्हापूर ः शहरात विविध ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये दुचाकी, सायकल आणि मोबाईल फोन चोरी करण्याची घटना घडली. याची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंकाळा येथील जॉकी बिल्डिंगसमोर लावलेली दुचाकी शुक्रवारी (ता. ३) अज्ञाताने चोरून नेली. याबाबतची फिर्याद रोहित तानाजी भालेकर (वय २३, रा. सांगवडे, ता. करवीर) यांनी दिली. दुसरी घटना मुक्तसैनिक वसाहत येथे घडली. येथील १२ हजार रुपयांची सायकल चोरून नेण्यात आली. याबाबतची फिर्याद अविनाश मेघानी (वय ३४, रा. मुक्तसैनिक वसाहत) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट जवळून मोबाईल चोरी होण्याची घटना नुकतीच घडली. देवांशी दिग्विजय मोरे (वय ३१, रा. दुधाळी परिसर) हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पाणी पित होते. या वेळी त्यांनी मोबाईल बाजूला ठेवला असता, तो काही वेळात गायब झाला. याबाबतची फिर्याद त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
--------
शिंगणापुरात एकाची आत्महत्या
कोल्हापूर ः शिंगणापूर येथील सुरेश शंकर कांबळे (वय ५५) यांनी आत्महत्या केली. त्यांनी राहत्या घरी तुळईला दोरीने गळफास घेतला. करवीर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. कांबळे यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.