
राजाराम सुनावणी
लोगो
...
`राजाराम’ चे १८९९ सभासद वैधच
सर्व हरकती फेटाळल्या ः सतेज पाटील गटाला मोठा धक्का
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या प्रारूप मतदार यादीतील सभासद अवैध असल्याबाबत आलेल्या सर्व हरकती प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांनी फेटाळून लावल्या. परिणामी या यादीतील यापूर्वी अवैध ठरवण्यात आलेले १८९९ सभासद वैध ठरले. या निर्णयाने कारखान्यातील सत्तारूढ गटाविरोधात जोरदार मोर्चेबांधणी करत असलेल्या आमदार सतेज पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, संस्था गटातील शौमिका महाडीक यांच्या नावावर घेण्यात आलेला आक्षेपही श्री. गाडे यांनी फेटाळून लावला. त्यामुळे महाडीक यांचेही मतदार यादीतील नाव वैध ठरले. महाडीक यांनी ज्या संस्थेच्या नावाचा ठराव दिला होता, त्या संस्थेच्या त्या सभासद नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता, पण या संस्थेने महाडीक संस्थेच्या सभासद असल्याचा दाखला सुनावणीवेळी दिला.
यापूर्वी ‘राजाराम’ च्या प्रारूप मतदार यादीतून तत्कालीन प्रभारी प्रादेशिक साखर सहसंचालक अरूण काकडे यांनी १८९९ सभासद अपात्र ठरवले होते. याच निर्णय तत्कालीन सहकार मंत्री व उच्च न्यायालयाने कायम ठेवला होता. या निर्णयाला सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावरील निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने या सभासदांची फेरचौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्री. गाडे यांनी १३ फेब्रुवारी रोजी यापूर्वी अपात्र ठरवलेल्या १८९९ सभासदांसह प्रारूप यादी प्रसिध्द केली होती. त्यावर २२ फेब्रुवारीपर्यंत १९ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यात या १८९९ सभासदांना पुन्हा अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. यावर १ मार्च रोजी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर काल (ता. ६) श्री. गाडे यांनी मतदार यादीवर आलेल्या सर्व हरकती फेटाळून लावतानाच यापूर्वी अपात्र ठरवण्यात आलेले १८९९ सभासद वैध असल्याचा निर्णय दिला. या निर्णयाने सत्तारूढ महाडीक गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
.............
एप्रिल महिन्यात निवडणुकीचा धुरळा
प्रारूप यादीवरील सर्व हरकती फेटाळल्या असल्या तरी विरोधी गटांकडून पुन्हा या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. पुन्हा न्यायालयील प्रक्रिया झाली नाही तर मात्र ९ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होईल तर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.
............
‘ज्याप्रमाणे सप्तगंगा साखर कारखान्याचे पाच हजार सभासद एका रात्रीत कमी करून त्याठिकाणचा सहकार संपवण्यात आला. त्याच धर्तीवर ‘राजाराम’ मधील सहकार संपवून सत्ता मिळवण्याचा विरोधकांचा कुटील डाव या निर्णयाने फसला आहे. राजकीय द्वेषातून सहकाराच्या मुळावर घाव घालू पाहणाऱ्या आमच्या विरोधकांच्या घातकी प्रवृत्तीला सभासद निवडणुकीत चोख उत्तर देतील.
अमल महाडीक,
माजी आमदार व संचालक