
खणदाळला १४ मार्चपासून श्री महालक्ष्मी देवीची यात्रा
खणदाळला १४ मार्चपासून
श्री महालक्ष्मी देवीची यात्रा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : खणदाळ (ता. गडहिंग्लज) येथे १४ ते १६ मार्चअखेर श्री महालक्ष्मी देवीची यात्रा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक आणि करमणूक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी दिली.
शुक्रवारी (ता. १०) रात्री दहा वाजता अक्षता टाकण्याचा कार्यक्रम होईल. ११ मार्चला रात्री करमणूक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवारी (ता. १२) सकाळी नऊला मॅरेथॉन, सायकल शर्यती, सायंकाळी पाच वाजता सुवासिनींची ओटी भरणे व महाआरती आणि रात्री आर्केस्ट्राचा कार्यक्रम होईल. १३ मार्च रोजी रात्री आठ वाजता शालेय कार्यक्रम होणार आहे. मंगळवारपासून (ता. १४) मुख्य यात्रेला प्रारंभ होणार आहे. सकाळी सहा वाजता श्री महालक्ष्मी मूर्तीची प्रतिष्ठापना, नऊला पालखी सोहळा व सायंकाळी सात वाजता श्री देवीची ओटी भरण्यात येईल. रात्री अकरा वाजता श्री देवीची मिरवणूक सुरू होईल. बुधवारी (ता. १५) दुपारी बाराला रेड्यांची मिरवणूक व रात्री साडेनऊला तमाशाचा कार्यक्रम आहे. दिवसभर जेवणावळी आहेत. गुरुवारी (ता. १६) सकाळी आठला शर्यती, रात्री दहा वाजता श्री देवीची मिरवणूक होणार असून याच दिवशी यात्रेची सांगता होणार आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात येणाऱ्या भाविकांसाठी पाणीपुरवठा, आरोग्य सुविधांचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे. गाव स्वच्छतेची कामेही सुरू झाली आहेत. विविध खेळण्यांसह साहित्याची दुकाने मांडण्यात येणार आहेत. पाच वर्षांनी होणाऱ्या या यात्रेनिमित्त संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण आहे. माहेरवाशिणींसह पै-पाहुण्यांचे गावात आगमन सुरू झाले आहे. यात्रा समितीच्या सदस्यांसह ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यात्रेचे नियोजन करीत आहेत.