
अपहरण मुलाची ४८ तासांत सुटका
८७४९२
मोहन शितोळे, छाया शितोळे
कोल्हापूर ः अपहृत मुलाची ४८ तासात सुटका करणाऱ्या पोलिस पथकासह जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे. (नितीन जाधवः सकाळ छायाचित्रसेवा)
अपहृत मुलाची ४८ तासांत
सुटका; दाम्पत्याला अटक
आदमापुरातून अपहरण; सांगोल्यात कारवाई
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा मंदिर परिसरातून अपहरण झालेल्या सहा वर्षांच्या मुलाला ४८ तासांत पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून सुखरूप परत आणले. पोलिसांनी या प्रकरणी मोहन अंबादास शितोळे (वय ५०) व त्याची पत्नी छाया (३०, दोघे रा. जवळा, ता. सांगोला. जि. सोलापूर) यांना अटक केली. मुलबाळ होत नसल्यामुळे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती तपासात उघड झाल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः आदमापूर येथे संत बाळूमामा मंदिर आहे. तेथून सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद शिवाजीनगर (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील महिलेने चार मार्चला भुदरगड पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तातडीने सात पथके तयार केली. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पथकांना मार्गदर्शन केले. गडहिंग्लजचे उपअधीक्षक राजीव नवले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे, भुदरगडचे निरीक्षक अजयकुमार सिंगकर यांनी पथकाचे नेतृत्व केले. अपहरण झालेल्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यावेळी संबंधित मुलगा बाळूमामा मंदिरापासून एका दुचाकीवर बसून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी पुढे त्या मार्गे तपास सुरू ठेवला.
तपासात दुचाकीवर महिलासुद्धा असल्याचे दिसून आले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि अन्य तांत्रिक बाबींचा संदर्भ घेऊन शोध सुरू केला. रस्त्यावरील सर्व लॉज, हॉटेल, धर्मशाळा, बसस्थानक, रेल्वे स्थानक धुंडाळली. त्या दरम्यान दुचाकीचा क्रमांक मिळून आला. त्यावरून मोहन शितोळे (रा. मूळ मेढा, जावळी जि. सातारा) आणि त्याची पत्नी छाया यांनी अपहरण केल्याचे पोलिसांना स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी दोघांचा शोध घेतला. सध्या ते जवळा (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे राहत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी तेथे माहिती घेतली. पोलिस उपनिरीक्षक विनायक सपाटे, अंमलदार सुरेश पाटील, रणजित पाटील, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, अनिल जाधव, सारिका मोटे यांनी तेथून मुलासह दाम्पत्यास ताब्यात घेतले.
पत्रकार परिषदेस अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, गडहिंग्लज उपअधीक्षक राजीव नावले उपस्थित होते.
बक्षीस जाहीर
सांघिक प्रयत्नामुळे तपास पूर्ण झाला. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पंधरा आणि उपअधीक्षक नावले यांच्या पथकाला दहा हजार रुपयांचे बक्षीस आज जाहीर केल्याचीही माहिती अधीक्षक बलकवडे यांनी दिली. मुलाला सुखरुप आणण्यात सातही पथकांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले. केवळ मूल होत नसल्याचे सांगून संबंधित मुलाला घेऊन गेल्याचे तपासात स्पष्ट झाले.
असा मिळाला धागा...
एका सीसीटीव्हीतील फुटेजनुसार दाम्पत्य मुलाला घेऊन निपाणी (कर्नाटक) येथे गेल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्या परिसरातील सुमारे ९०-९५ सीसीटीव्ही फुटेज तपासली. तेंव्हा दाम्पत्य मुलाला घेवून चिक्कोडीकडे गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी निपाणी, चिकोडी, चिंचणी मायाक्का मार्गे मिरज असा मागत काढला. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीचा क्रमांकही मिळला. त्यानुसार पोलिसांनी गाडी मालक, त्याचा पत्ता सर्व काही मिळविले.
गाडीवर बसल्याच्या आनंदात
आई सोबत मुलगा नेहमी चालतच फिरत होता. चालत असल्यामुळे त्याचे पायही सुजले होते. त्याला दुचाकीवरून फिरायला मिळाल्यामुळे तो आनंदी होता. त्याची आईसुद्धा त्याला वेगवेगळ्या मंदिरात चालतच घेऊन जात होती, अशीही माहिती बलकवडे यांनी सांगितले.