महिलांच्या सक्षमीकरणाला खो! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांच्या सक्षमीकरणाला खो!
महिलांच्या सक्षमीकरणाला खो!

महिलांच्या सक्षमीकरणाला खो!

sakal_logo
By

महिलांच्या सक्षमीकरणाला खो!
कर्जावरील व्याज परतावा नाही; बचत गटांना चार वर्षांपासून प्रतीक्षा
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण सुरू असल्याचे चित्र उभा केले जाते. मात्र, याच सक्षमीकरणाला खो देण्याचा प्रकार शासनाकडून सुरू आहे. महिला बचत गटांना चार वर्षांपासून कर्जावरील व्याज परतावाच मिळालेला नाही. दोन वर्षे कोरोनाचे कारण पुढे केले. आता त्या संकटातूनही मुक्तता झाली आहे. त्यामुळे व्याज परतावा देणार कधी, असा प्रश्न महिला बचत गटांकडून उपस्थित केला जात आहे.
महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचत गटांचा मोठा आधार मिळाला आहे. गावागावांत बचत गटांचे जाळे पसरले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानाच्या माध्यमातून त्यांचे कामकाज पाहिले जाते. बचत गटांना व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी बँकांच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो. कर्जाचे हप्ते भरले जातील तसे दर तीन महिन्यांनी बचत गटांना शासनाकडून व्याज परतावा दिला जातो. तीन लाखांपर्यंतच्या कर्जाला जास्तीत जास्त १२ टक्के व्याज परतावा आहे. यात राज्य सात टक्के, तर त्यावरील वाटा केंद्र सरकार उचलते.
मात्र, चार वर्षांपासून महिला बचत गटांना कर्जावरील व्याज परताव्याची रक्कमच मिळालेली नाही. सुरवातीला दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावाचे कारण पुढे केले जात होते. कोरोनामुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता. त्यामुळे हे कारण समजून घेणे शक्य होते. मात्र, वर्षभरापासून सारे पूर्वपदावर आले आहे. शासनाच्या सर्व योजना पूर्वीसारख्याच कार्यान्वित आहेत. नव्या योजनांसाठी कोट्यवधींचा निधी रिता केला जात आहे. मग महिला बचत गटांच्या व्याज परताव्यासाठी निधी उपलब्ध करतानाच नेमकी कोणती अडचण येत आहे, हा प्रश्न आहे.
----------------------------
* पायाच खिळखिळा करण्याचा प्रकार
बिनव्याजी कर्ज उपलब्ध झाल्यास महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळेल. हीच बाब लक्षात घेऊन शासनाने व्याज परतावा योजना सुरू केली. खरे तर या पायावरच बचत गट चळवळी उभी आहे. मात्र, त्याच परताव्याचा लाभ बचत गटांना चार-चार वर्षे मिळत नाही. त्यामुळे बचत गट चळवळीच्या पाया खिळखिळा करण्यातलाच हा प्रकार म्हणावा लागेल.
---------------------------
* व्याप्ती वाढवण्याची गरज
बचत गटांना तीन लाखांच्या कर्जावरच व्याज परतावा मिळतो. पण, अनेक बचत गट १० लाखांपर्यंत कर्ज घेतात. अशा गटांना तीन लाखांवरील कर्जावर व्याज परतावा मिळत नाही. अधिक चांगले काम करणाऱ्या गटांवर खरे तर हा अन्यायच म्हणावा लागेल. त्यामुळे शासनाने व्याज परतावा योजनेची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे.
--------------------
जिल्ह्यातील बचत गटांचे १९ कोटी अडकले
- केंद्राकडून रखडलेला व्याज परतावा..... सुमारे सात कोटी ७८ लाख रुपये
- राज्याकडून रखडलेला व्याज परतावा... सुमारे दहा कोटी ८९ लाख रुपये