
विद्यापीठ निधीतून डॉ. वाघमारे कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत करा
87530
कोल्हापूर : केजी टू पीजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संयुक्त कृती समितीने विविध मागण्यांचे निवेदन प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांना दिले.
डॉ. वाघमारे कुटुंबीयांना
१० लाखांची मदत करा
केजी टू पीजी शिक्षक कृती समितीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : शिवाजी विद्यापीठातील मायक्रोबायॉलॉजी विभागातील कंत्राटी प्राध्यापक डॉ. शैलेश वाघमारे यांनी आर्थिक विवंचनेतून केलेली आत्महत्या सर्वसाधारण नसून ते सरकारी धोरणाचा बळी आहेत. त्यामुळे त्यांना न्याय मिळावा, यासाठी शिवाजी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. त्यांच्या कुटुंबीयांना विद्यापीठ निधीतून १० लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी केजी टू पीजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संयुक्त कृती समितीतर्फे निमंत्रक डॉ. उदय नारकर यांनी केली.
डॉ. वाघमारे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारात शोकसभा झाली. त्यात विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी डॉ. वाघमारे यांना टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रातील गंभीर प्रश्नांची समाजाने दखल घेऊन ती बदलण्यासाठी एकजुटीने आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. शोकसभेत ‘सुटा’चे डॉ. डी. एन. पाटील, ‘सुप्टा’चे डॉ. कोळेकर, शासकीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वसंत डावरे, प्राचार्य ए. बी. पाटील, ‘आयटक’चे एस. बी. पाटील, प्राथमिक शिक्षक समितीचे सुधाकर सावंत, एसएफआयचे पंकज खोत, अजय सकट, कृती समितीचे निमंत्रक प्रा. सुभाष जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, या कृती समितीच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांना दिले. त्यावर शासनस्तरावरील मागण्या शासनाकडे, तर विद्यापीठ पातळीवरील मागण्या प्रशासनासमोर ठेवू, असे आश्वासन डॉ. पाटील यांनी दिले.
-----------
कृती समितीने केलेल्या मागण्या
- डॉ. वाघमारे यांच्या वेतनातील फरकाची देय रक्कम कुटुंबीयांना द्यावी
- डॉ. वाघमारे यांच्या एका वारसास विद्यापीठात नोकरी द्यावी
- रिक्त जागा भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा
- तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नेमणुकीसाठीची प्रक्रिया गतिशील करा
- प्राध्यापकांचे ठरलेले मानधन नियमित द्यावे