
१ लाख ७७ हजारांची फसवणूक
कर्ज मिळवून देण्याच्या अमिषाने
१ लाख ७७ हजारांची फसवणूक
कोल्हापूर, ता. ७ ः बॅंकेकडून कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून १ लाख ७७ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला. सुमित शरदचंद्र उपाध्ये (रा. इचलकरंजी) आणि पूजा राजकुमार चौगुले (पत्ता उपलब्ध नाही) अशी दोघांची नावे असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी सांगितले, की म्हालसवडे (ता.करवीर) येथील फिर्यादी भगवान केरबा पाटील यांना बुलडोझर खरेदीसाठी २५ लाख रुपये कर्ज पाहिजे होते. शाहूपुरीतील एका बँकेतून सिबिल स्कोअर न पाहता कर्ज दिले जाईल, अशी जाहीरात वाचली. त्यामुळे पाटील यांनी जाहिरातीतील संदर्भानुसार कार्यालयात चौकशी केली. तेथे सुमित उपाध्ये याने आपण ठाण्यातील एका नामांकित बँकेच्या कोल्हापुरातील शाखेचे शाखाप्रमुख, तसेच पूजा चौगुले या उपशाखा प्रमुख असल्याचे सांगितले.
दरम्यान, कर्ज मिळवून देण्यासाठी डिसेंबर २०२१ मध्ये फिर्यादी पाटील यांच्याकडून तीन कोरे स्टॅम्प, १३ कोरे धनादेश आणि प्रोसेसिंग फी म्हणून एक लाख ७७ हजार रुपये घेतले. यानंतर आजपर्यंत पाटील यांना कर्ज मिळालेले नाही. तसेच पैसेही परत मिळाले नाहीत. त्यामुळे अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात पाटील यांनी काल शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.