
अन्य पत्रके कॉमन
अवनि संस्थेतर्फे होळीची पोळी वाटप
कोल्हापूर : अवनि संस्थेमार्फत होळीची पोळी वाया न घालवता गरजू मजुरांना पोळी मिळण्यासाठी, ‘होळी लहान पोळी दान’ या सामाजिक उपक्रमाचे आवाहन विविध शाळा, मंडळे, नागरिकांना केले होते. या उपक्रमांतर्गत आदर्श शाळा, श्रीमती सरस्वती सावंत विद्यामंदिर, कळंबा गर्ल हायस्कूल, सांदपनी विद्यालय शाळेने तसेच बापूरामनगर, जिवबानाना जाधव पार्क, कळंबा येथील विविध मंडळे, महिला, नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. पोळ्या जमा करून संस्थेला दिल्या. या उपक्रमात वीटभट्टी आणि ऊस तोडणीवरील डे केअर सेंटरमध्ये ३२७ मुलांना या पोळ्या वाटप केल्या. साताप्पा मोहिते, अमर कांबळे, रवींद्र कुराडे, राधिका लोखंडे, सोनाली कांबळे, सर्व शिक्षक उपस्थित होते.
...
ब्राह्मण सभा करवीरतर्फे उद्या जागृती अभियान
कोल्हापूर : ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, वनिता सांस्कृतिक संस्थेतर्फे शनिवारी (ता. ११) कॅन्सर जागृती अभियान अंतर्गत मोफत मार्गदर्शन व्याख्यान आयोजित केले आहे. या अभियानात महिलांना उद्भवणाऱ्या समस्यांवर मोफत मार्गदर्शन होणार आहे. डॉ. राधिका जोशी, डॉ. विक्रम राजाज्ञा, डॉ. रेश्मा पवार यांचे मार्गदर्शन होईल. महिलांना उद्भवणाऱ्या समस्यांवर चर्चासत्रही होईल. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, बिनखांबी गणेश मंदिर जवळ सायंकाळी चार वाजता अभियानास सुरुवात होईल. महिलांनी अभियानांतर्गत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अॅड. विवेक शुक्ल, कार्यवाह श्रीकांत लिमये, महिला विभागाच्या अनुराधा गोसावी, वृषाली कुलकर्णी, वनिता सांस्कृतिक संचालक मंडळातर्फे वैदेही जोशी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
...
दि आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे ‘हॅपिनेस प्रोग्रॅम’
कोल्हापूर : दि आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे हॅपिनेस प्रोग्रॅम १० ते १४ मार्च दरम्यान महालक्ष्मी हॉल, महालक्ष्मी बँकेच्या वरती, केळवकर हॉस्पिटलसमोर, ताराबाई पार्क येथे आयोजन केले आहे. यामध्ये योगा, ध्यान, प्राणायाम, श्वसनप्रक्रियावर आधारित सुदर्शनक्रिया आदींचे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. तसेच रागावर नियंत्रण, तणावमुक्त जीवन कसे जगावे, टाईम मॅनेजमेंट, निरोगी शरीर, निर्णयक्षमता यावर मार्गदर्शन केले जाईल. शिबिरात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षिका डिंपल गजवाणी मार्गदर्शन करतील. तरी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन निमेश पाटील यांनी केले आहे.