
गोबल रूबेला
१६, ५६४ मुलांचे
‘गोवर रूबेला’चे
नियमित लसीकरण
कोल्हापूर, ता. ८ ः शहरामध्ये गोवर रूबेला लसीकरणाच्या दोन मोहिमांचे टप्पे राबवण्यात आले. त्यानंतरही वंचित राहिलेल्या मुलांसाठी १० मार्चपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. आजतागायत या मोहिमांमधून वंचित राहिलेल्या २१४ मुलांना दोन डोस देण्यात आले. नियमित लसीकरणातून जानेवारीअखेरपर्यंत शहरातील विविध केंद्रांवर १६ हजार ५६४ मुलांना डोस देण्यात आले.
लहान मुलांना नियमित लसीकरणातून गोवर रूबेलाचे डोस दिले जातात. महापालिकेच्या दवाखान्यात मुलांच्या नियमित लसीकरणासाठी शहरातील तसेच परिसरातील पालक येतात. नियमित लसीकरणाला प्रतिसाद चांगला असतो. त्यातून पहिला डोस ८०४४ मुलांना, तर दुसरा डोस ८५२० मुलांना देण्यात आला. तरीही ऊसतोड कामगार, वीटभट्टी, बांधकाम कन्स्ट्रक्शन, स्थलांतरित कुटुंबांतील मुलांचे लसीकरण राहण्याची शक्यता असते. तसेच इतर ठिकाणी गोवर रूबेलाचा उद्रेक झाल्याने शासन आदेशानुसार डिसेंबर, जानेवारी अशा दोन महिन्यांत महापालिकेने मोहीम राबवली. आता दहा मार्चपर्यंत तिसरी मोहीम हाती घेतली आहे. त्यात ५६ मुलांचे उद्दिष्ट आहे. या तीनही मोहिमांमधून पहिला डोस ९२ मुलांना, तर दुसरा डोस १२२ मुलांना दिला आहे.
उष्ण व थंड वातावरणाने सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रमेश जाधव म्हणाले, ‘‘यापूर्वी कोरोनात मास्क तसेच एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याच्या नियमांची अंमलबजावणी करत होतो. तसेच नागरिकांनी स्वतःहून हे नियम पाळले तर कुटुंबीयांबरोबरच संपर्कात येणाऱ्या इतरांना संसर्ग कमी होईल.’’