
इचल : पाणी प्रश्न
घोसरवाडमधून दूधगंगेतून इचलकरंजीला पाणी
सिध्देश्वर संस्थेचा प्रस्ताव; खासदार धैर्यशील माने यांची माहिती, १३ गावांची इच्छा असेल तरच विचार
इचलकरंजी, ता. ८ ः दानवाडला बंधारा बांधून व घोसरवाडमधून दूधगंगा नदीतून पाणी उपसा करुन इचलकरंजीला पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सिद्धेश्वर पाणीपुरवठा संस्थेकडून आला आहे. परिसरातील १३ गावांची इच्छा असेल तरच प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला जाईल, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी आज दिली.
घोसरवाड (ता. शिरोळ) येथे खासदार मानेंच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी इचलकरंजीला घोसरवाडमधून पाणी देण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. यावेळी खासदार माने पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, ‘विजीतसिंह शिंदे - सरकार यांनी सिध्देश्वर पाणीपुरवठा संस्थेकडून प्रस्ताव दिला आहे. इचलकरंजीला घोसरवाडमधून पाणी देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र काही सूचना केल्या आहेत. सध्या परिसरात दूधगंगा नदी कोरडी आहे. घोसरवाडमधून सात गावांना पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. दानवाडला उंचीचा बंधारा बांधल्यास तर घोसरवाडमधून इचलकरंजीस पाणीउपसा करता येईल. नदी सतत प्रवाहित राहिल्यामुळे महाराष्ट्रातील दूधगंगा काठावरील १३ गावांना बारमाही पाणी मिळेल.’
ते म्हणाले, ‘प्रस्तावानुसार महाराष्ट्रातील शेवटच्या गावात बंधारा होणार असल्याने एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही. मात्र, हा प्रस्ताव पाणीपुरवठा संस्थेचा होता. ग्रामस्थांची इच्छा असेल तरच प्रस्ताव मांडून शासनपातळीवर पाठपुरावा होईल. संबंधित गावांतील ग्रामस्थांशी संवाद सुरू आहे. लवकरच समन्वय बैठकही होईल.’
सुळकूड योजनेचे काम सुरूच
सुळकूड योजनेसाठी निधी मंजूर आहे. त्या कामाची निविदा काढली आहे. त्याला मक्तेदारांचा प्रतिसाद आहे. त्यावर पुढील प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.
---------
कमी खर्चात योजना
घोसरवाडमधून पाणी उपसाची योजना कमी खर्चिक आहे. कमी अंतर असून सायफन पध्दतीने पाणी आणता येईल. यासाठी केंद्र शासनाची परवानगी लागत नाही. राज्य शासन थेट योजनेला मंजुरी देऊ शकते, अशी माहिती खासदार माने यांनी दिली.
-------
उपसाबंदीबाबत शाश्वती हवी
पिण्याच्या पाण्यास प्राधान्य असल्याने शेतीसाठी उपसाबंदी होते. त्यामुळे शेतक-यांना फटका बसतो. इचलकरंजीला पाणीपुरवठा केल्यास शेतीसाठी उपसाबंदी होणार नसल्याची ठोस हमी हवी, असा आग्रह ग्रामस्थांनी केला. प्रस्तावाबाबत ग्रामस्थांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सुळकूड योजनेला मात्र ग्रामस्थांनी ठामपणे विरोध दर्शविला.